शिरोळ : देशांतर्गत शिल्लक असलेला साखरसाठा व चालू हंगामातील उत्पादन यामुळे साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. अपेक्षेप्रमाणे बाजारात साखरेला मागणी नसल्यामुळे अडचणीच्या परिस्थितीतही एफआरपीप्रमाणे विनाकपात ऊस पुरवठा केलेल्या सभासदांना रक्कम अदा केली आहे. वित्तीय संस्थांची देणी ज्या त्या वेळी अदा केली असून, कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे, अशी माहिती दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली.
येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ४९ व्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली. १३९ दिवस चाललेल्या या हंगामात ११ लाख ९२ हजार २६८ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, १२.४३ सरासरी साखर उताऱ्याने १४ लाख ८२ हजार ३०० साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. असे सांगून अध्यक्ष पाटील म्हणाले, ऊसतोडणी मजुरांचा प्रश्न पाहता कारखान्याने २२ तोडणी मशीन यंत्रणेचे करार केले. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी तोडणी मशीनद्वारे तोडल्या जाणाऱ्या उसासाठी पालापाचोळा १ टक्का कपात करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. ११ लाख ३८ हजार ८२७ मेट्रिक टन उसाचे एफआरपीप्रमाणे विनाकपात ३२३ कोटी ४६ लाख ४३ हजार रुपये ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. हा हंगाम सर्वांच्याच सहकार्यामुळे यशस्वीरीत्या पार पडला असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, महेंद्र बागे, अशोक कोळेकर, दगडू माने, अशोक शिंदे, विश्वजीत शिंदे, संजय संकपाळ, संजय भोसले, श्रीशैल्य हेगाण्णा, दिलीप जाधव, राजेंद्र केरीपाळे, जवसिंग जाधव, प्रदीप बनगे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
चौकट -
एकरी २०० टनाकडे वाटचाल
कारखान्याने एकरी २०० टनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये औरवाडचे प्रकाश जाधव या शेतकऱ्याने एकरी १६० मेट्रिक टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांना वसंतदादा शुगरचा महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा ऊस भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे.
फोटो - २७०३२०२१-जेएवाय-०२-गणपतराव पाटील