कोल्हापूर : ‘विद्यार्थ्यांनी स्वच्या जाणिवेचा शोध घ्यावा’, असे आवाहन जुगाड कौन्सेलिंग सेंटरच्या डॉ. कल्याणी कुलकर्णी यांनी केले. चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत ‘वयात येताना’ या विषयावर घेण्यात आलेल्या कार्यशाळेत डॉ. कुलकर्णी बोलत होत्या.साळोखेनगर येथील कोपर्डेकर हायस्कूल येथे या कार्यशाळेस प्रारंभ झाला. तीन तासांच्या दोन सत्रांत जुगाडच्या डॉ. कुलकर्णी आणि सुखदा आठल्ये यांनी या किशोरवयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रारंभी चिल्लर पार्टीच्या अर्चना शिंदे आणि पद्मजा बकरे यांनी ‘सिनेमा पोरांचा’ हे पुस्तक भेट देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यशाळेत चिल्लर पार्टीचे ३० युवा सदस्य सहभागी झाले होते.पहिल्या सत्रात सुखदा आठल्ये यांनी वयात येणाऱ्या किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर भाष्य करून, अभ्यास कसा करावा, का करावा, त्याचे नियोजन कसे करावे, करिअरचे लक्ष्य कसे गाठावे, आदी विषयांवर थेट संवाद साधला. दुसऱ्या सत्रात जुगाड कौन्सेलिंग सेंटरच्या डॉ. कल्याणी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना स्वच्या जाणिवेचा शोध घेण्याचे आवाहन केले. डॉ. कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात जगण्याच्या गरजांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
शिक्षण घेताना जगण्यासंदर्भात नात्याचा अर्थ विद्यार्थ्यांनी समजावून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमांतून थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी आंतरवैयक्तिक नाते, स्वत:विषयक नाते, स्वत:बरोबरचे नाते, इतर व्यक्ती, वस्तू, पर्यावरण, देश यांच्यासोबत असणारे नाते यांविषयी सविस्तर चर्चा केली. चिल्लर पार्टीच्या शिवप्रभा लाड यांनी प्रास्ताविक केले. उदय संकपाळ यांनी सूत्रसंचालन केले, तर अभय बकरे यांनी आभार मानले. मिलिंद कोपर्डेकर यांनी चिल्लर पार्टीविषयी माहिती दिली.