तानाजी पोवारकोल्हापूर : औषधे संपली, अन ती माऊली अस्वस्थ झाली, रात्रीची झोप येईना, हातपाय ताठरु लागले, चक्कर येऊ लागली... अखेर १६ वर्षाच्या पोटच्या पोराचा आधार घेत तीने पोलीस ठाणे गाठलं... तेथेही औषध आणण्यासाठी पर जिल्ह्यात जाण्याचा पास मिळेना. पण तेथं त्यांना खाकी वर्दीत देवच भेटला. माऊलीची तगमम पाहून खाकी वर्दीतील सुहास पोवार या खाकी वर्दीतील माणूसलेपणाने ‘लॉकडाऊन’ ची स्थिती भेदली.
अवघ्या २४ तासातच औषधे उपलब्ध करुन घरपोेच केली. अन् त्या माऊलीने भारावून थेट हात जोडले. साहेब, तुम्हीच परमेश्वर.. खाकीतही मी देव पाहिला असे त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. अन् त्यांनी अश्रुंना मोकळी वाट करुन दिली. जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस सुहास पोवार यांनी खाकी वर्दीतही माणूसकी असल्याचे दाखवून दिले.
रविवारी सायंकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ४० वर्षीय माऊली मुलाचा आधार घेत आली. आपल्याला मिरजेतील डॉक्टरांकडे मानसोपचाराची औषधे सुरु आहेत, पाच दिवसापूर्वी औषधे संपली, झोप लागत नाही, अंग थरथरतय. लॉकडाऊनमुळे जिल्हा सोडता येईना, औषधे आणायला जायचंय, परवानगी द्या अशी आर्त विनवणी केली. त्या माऊलीने रडतच मंजुषा मुगडे रा. साकोली कॉर्नर असे नाव, पत्ता सांगितला.
पोलीस हवलदार सुहास पोवार यांनी त्या मिरज येथील डॉक्टरांचा पत्ता व औषध चिठ्ठीचा फोटो घेतला. औषधे घरी पोहच करण्याचे आश्वासीत केले. माऊली आशा बाळगून परतली. पोवार यांनी सांगलीतील आपल्या भावाच्या मोबाईलवर डॉक्टर व औषधांची माहिती पाठवली. त्याद्वारे औषधे उपलब्ध केली. सोमवारी सायंकाळी सुहास पोवार यांनी सहकारी संताजी चव्हाण यांना घेऊन त्या माऊलीचा पत्ता शोधून औषधे पोहच केली.
त्याक्षणी काहीवेळ माऊलीच्या तोंडून शब्दच फुटेना. दोघांकडे एकटक पहात तीने हात जोडले. वेळेत औषधे मिळाल्याचा आनंद आणि भाव अश्रु त्यांच्या डोळ्यातून टपकत होता. ‘साहेब तुम्हीच परमेश्वर.. मला आज खाकीतही देव दिसला’ असे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले.उदरनिर्वाहही संपला...मंजुषा मुगडे यांनी, आम्ही माय-लेक दोघंच भाड्याने राहतो, घरखर्चासाठी मेस चालवतो, लॉकडाऊनमुळं यात्री निवासचे कामगारही गावी गेल्याने डब्याचीही रोजी रोटी बंद झाली, आता कसं व्हायचं म्हणतच त्यांना रडू कोसळले.