silver oak attack: मास्टरमाईंड कोण? चिथावणीखोर भाषण कोणी केले, हे शोधून काढू - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 11:16 AM2022-04-09T11:16:26+5:302022-04-09T11:17:22+5:30
या घटनेचे दूध का दूध व पानी का पानी निश्चितच करू असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर : न्यायालयाने आदेश दिल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी गुलालाची उधळण केली, पेढे वाटून आनंद व्यक्त केला. दुसऱ्याचदिवशी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यापर्यंत मजल काहीजणांनी मारली. यामागचा मास्टरमाईंड कोण, चिथावणीखोर भाषण कोणी केले, हे शोधून काढू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात असे प्रकार चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या घटनेचे दूध का दूध व पानी का पानी निश्चितच करू असेही त्यांनी स्पष्ट केले.
उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार हे या वयातही शेतकरी, कष्टकरी, कामगार, उद्योजक यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्रिय आहेत. गारपीट, नैसर्गिक आपत्तीमध्येही जादाची मदत मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतात.
ज्या ज्या वेळी कामगार- उद्योजक यांच्यात अंतर पडले त्यावेळी हस्तक्षेप करून मार्ग काढला. अठरा-पगड जातींना सोबत घेऊन ते काम करतात. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याही पूर्ण करण्यासाठी त्यांनी मदत केली. माझ्यासह काँग्रेस, शिवसेनेचे नेते, मंत्र्यांनीही प्रयत्न केले. कोरोना काळात एसटी महामंडळाला करोडो रुपये दिले. कोणाची मेहेरबानी म्हणून नव्हे, तर एसटी कर्मचारीही आपलेच आहेत, या भूमिकेतून मदत केली.
विलीनीकरणासंबंधी न्यायालयाने दिलेेले आदेश परिवहन मंत्री अनिल परब यांनी मान्य केले. एसटी कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सवही साजरा केला. त्यानंतर आज पवार यांच्या घरापर्यंत पोहोचून हल्ला केला जातो. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या राज्यात असे प्रकार चुकीचे आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगती करीत आहे, हे कोणाला बघवत नाही का ?
पोलिसांचे अपयशच
पवार यांच्या घरावर हल्ला झाला, त्याचे कव्हरेज करण्यासाठी मीडिया होता. याचा अर्थ त्यांना असे काहीतरी घडणार आहे, हे अगोदर माहीत होते; मग पोलीस यंत्रणेला हे का माहीत झाले नाही, अशी संतप्त विचारणा उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. ते म्हणाले, काही लोकांनी १२ तारखेला बारामतीला जाण्याची धमकी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क व्हायला हवे होते. पवारसाहेब हे तर राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्याबाबतच नव्हे, तर अन्य कुणाच्याही बाबतीत अशा घटना घडता कामा नयेत.