'ब' गटातील रेशनकार्डधारकांचे शासनाने धान्य बंद केले आहे; परंतु गडहिंग्लज तालुक्यातील अनेक मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबांची 'ब' गटात नोंद झाल्यामुळे त्यांना धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. अशा धान्य बंद झालेल्या गरीब कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना तत्काळ 'अ' गट शिधापत्रिकाधारक म्हणून नोंदविण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे काशिनाथ गडकरी यांनी निवेदनातून तहसीलदार दिनेश पारगे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, शासनाने ५९ हजारपर्यंत वार्षिक उत्पन्न असणारे अ गटातील शिधापत्रिकाधारक आणि त्यापेक्षा अधिक उत्पन्न असणारे 'ब' गटातील शिधापत्रिकाधारकांची वर्गवारी केली. 'अ' गटातील लाभार्थ्यांना प्राधान्य गट आणि 'ब' गटातील लाभार्थ्यांना प्राधान्य गट अशी विभागणी केली आहे.
रेशन दुकानदारांनी अधिक उत्पन्न असणाऱ्यांचे उत्पन्न कमी दाखवून त्यांना अ गटात तर कमी उत्पन्न असणाऱ्यांना अधिक उत्पन्न दाखविल्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांचे धान्य बंद झाले आहे.
निवेदनावर, संभाजी येरूडकर, तेजस घेवडे, अमित कोरी, मोहन नाईक, अनिकेत चव्हाण, प्रकाश पाटील, आकाश पोवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.