भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात दारू पिऊन वाहन चालविल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. यामुळे शहरात वाहतूक पोलीस विभाग तर जिल्ह्यात पोलीस ठाणेनिहाय ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह करणाऱ्यांना पकडून दंड करण्याची मोहीम राबवण्यात येते. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दारू पिऊन वाहन चालविण्याचे प्रकार वाढतात. यामुळे ३१ डिसेंबरच्या आधी दोन दिवस कारवाईसाठी व्यापक मोहीम राबविण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.
अनेक अपघात मद्य प्राशन करून वाहन चालविल्याने होतात, असे पोलिसांचे म्हणणे आहे. यामुळे पोलीस महामार्गावर आणि शहरातील प्रमुख चौकात थांबून तपासणी मोहीम राबवतात. तोंडाला छोटे यंत्र लावून दारू प्राशन केले की नाही, याची तपासणी केली जाते. पण दोन वर्षांपासून कोरोना आजाराचा संसर्ग झाल्याने यंत्राद्वारे तपासणी करणे बंद केले आहे. आता डोळे लाल झालेत, व्यवस्थित चालता येत नाही, असे दिसल्यास संबंधित चालकास पोलीस घेऊन जिल्हा रुग्णालयात आणि तालुक्याच्या ठिकाणी सरकारी रुग्णालयात नेऊन तपासणी करून घेतली जात आहे.डॉक्टरांनी दारू प्याल्याचा अहवाल दिल्यास त्या चालकाविरोधात दंडात्मक कारवाईसाठी प्रकरण पोलीस न्यायालयात दाखल करतात. न्यायालयात प्रत्येकी एक ते दोन हजारांपर्यंतचा दंड होतो, असे वाहतूक पोलीस प्रशासनाने लोकमतशी बोलताना सांगितले.
- पाच वर्षांचे आकडे काय सांगतात?
- २०१७ : २४८
- २०१८ : २६८
- २०१९ : २८५
- २०२० : २६३
- नोव्हेंबर २०२१ - ५९
- ३१ डिसेंबरची रात्र
- सरत्या वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी दारू पिऊन दुचाकी, चारचाकी चालविण्याची काही जणांत क्रेझ निर्माण झाली आहे. असे प्रकार शहरात अधिक प्रमाणात होतात.- यंदाचा ३१ डिसेंबर जवळ येत आहे. आता केवळ सहा ते सात दिवस राहिले आहेत. यामुळे वाहतूक पोलिसांनी ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे नियोजन केले आहे.
- वर्षभरात ५९ तळीराम सापडले
जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ अखेर ५९ तळीराम सापडले आहेत. कोरोनामुळे या वर्षात सात ते आठ महिने ड्रक ॲण्ड ड्राइव्ह पोलिसांना करता आले नाही. परिणामी कारवाई झालेल्या तळीराम वाहनचालकांची संख्या कमी आहे.
३१ डिसेंबरच्या दरम्यान ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह करणाऱ्यांना पकडून कारवाई करण्याचे व्यापक नियोजन केले आहे. वर्षभरातही अशी मोहीम राबवण्यात आली आहे. - स्नेहा गिरी, वाहतूक पोलीस निरीक्षक, कोल्हापूर