कोल्हापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्व ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास 100 रुपये, थुंकल्यास 200 रुपये दंड आकारण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी जारी केले आहेत.
ग्रामीण भागातील दुकानदार तसेच व्यावसायिक यांनी मास्क व हॅण्डग्लोज वापरणे बंधनकारक असून मास्क व हॅण्डग्लोज न वापरल्यास 500 रूपयांचा दंड आकारला जाईल, तर फिरते फळ व भाजी विक्रेत्यांनी मास्क व हॅण्डग्लोज न वापरल्यास 200 रूपये दंड आकारला जाईल. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणे तसेच थुंकणे, दुकानदार तसेच व्यावसायिक यांनी मास्क व हॅण्डग्लोज न वापरल्यास आणि फिरते फळ व भाजी विक्रेत्यांनीमास्क व हॅण्डग्लोज न वापरल्यास एकदा दंड केल्यानंतर दुसऱ्यांदा या नियंमाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्या व्यक्तीकडून दुप्पट दंड अथवा फौजदारी कारवाई अथवा दोन्ही करण्यात येईल.
कोरोना विषाणू (कोव्हिड-19) चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतींच्या कायक्षेत्रामध्ये उपाय-योजनेसाठी व कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय-योजनेची अंमलबजावणी कटाक्षाने करावी, असे निर्देश देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले की, या प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 45 अन्वये अनुसूची 1 (ग्रामसूची) मधील 24 व 25 च्या तरतूदीनुसार दंडात्मक कारवाई करण्याबाबत गटविकास अधिकारी यांनी आपले अधिनस्त सर्व ग्रामपंचायतींना आदेश द्यावेत. याकामी कोणतीही हायगय करु नये असा इशाराही मित्तल यांनी दिला.
ग्रामीण भागातील फळ व भाजी विक्रेते यांनी मास्क व हॅण्डग्लोजचा सक्तीने वापर करणे तसेच ग्रामस्थांनी सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर कायम मास्क/ रूमाल वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, वेळोवळी हात साबणाने धुणे व सॅनिटायझरचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी घाण न करणे आवश्यक असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी स्पष्ट केले. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती
भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र राहील, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, महाराष्ट्र कोव्हिड -19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितावर कारवाई करण्याबाबत जिल्हयातील सर्वच गट विकास अधिकाऱ्यांनी अधिनस्त ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचनाही मित्तल यांनी केली आहे.