कोल्हापूर : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहेत. त्यात पोलीसही विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारून संसर्गाचा फैलाव कमी करण्यासाठी झटत आहेत. तरीसुद्धा वीकेंड लाॅकडाऊन असूनही दिवसभरात मास्क न वापरणे, वाहन नियमांचा भंग करणे, निर्धारीत वेळेनंतरही आस्थापना सुरू ठेवणे अशा विविध केसेसद्वारे पोलिसांनी दिवसभरात १० लाख ८८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. तर ६३५ दुचाकी वाहने जप्त केली.
‘ब्रेक द चेन’ अतंर्गत कोल्हापूर पोलीस दलाने नियमभंग करून शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर आक्रमक कारवाईस गेल्या दोन दिवसांपासून सुरुवात केली आहे. त्यानुसार रविवारी दिवसभरात अशा विनाकारण व मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यात मास्क न घातल्याप्रकरणी २ हजार ६१६ जणांकडून ४ लाख ५० हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला. तर मोटर वाहन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी २ हजार ४५२ जणाकडून सर्वाधिक ५ लाख ४ हजार ३०० रुपयांचा व निर्धारित वेळेनंतरही आस्थापना उघडी ठेवल्याबद्दल १८२ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. यातून १ लाख ३४ हजार रुपये असा एकूण १० लाख ८८ हजार ६०० रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला.
चारचाकींविरोधात जोरदार मोहीम
दुचाकीवरून विनाकारण फिरल्यानंतर पोलीस कारवाईस सामोरे जावे लागते म्हणून अनेक जण चारचाकीतून फिरत आहेत. याशिवाय शनिवार व रविवार असे वीकेंड धरून पन्हाळा, आंबा आदी ठिकाणी पर्यटनही करीत आहेत. ही बाब जाणून रविवारी सायंकाळी दसरा चौक येथे लक्ष्मीपुरी पोलीस व शहर वाहतूक शाखेच्यावतीने १०० हून अधिक नियमभंग करणाऱ्या चारचाकी जप्त करण्यात आल्या. त्या सर्व दसरा चौक मैदानावर उभ्या करण्यात आल्या. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत शहरातील बिंदू चौक, मिरजकर तिकटी, शिवाजी पूल, राजारामपुरी, शाहूपुरी, दाभोळकर काॅर्नर चौक आदी ठिकाणी सुरू होती.