कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना महामारीचा कहर होत असताना संचारबंदीत नागरिकांचा बेशिस्तपणा सुरुच आहे. याला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारक अशा एकूण २४९९ जणांवर कारवाई करत सुमारे ३ लाख ५८ हजार ६०० रुपये दंड वसूल केला.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असतानाच तो आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी पुकारली आहे. बुधवारी दिवसभरात कोल्हापूर जिल्हा पोलीस दलामार्फत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या तब्बल २३२१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यापैकी १४७ दुचाकी जप्त करण्यात आल्या, तर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या २१७४ वाहनधारकांवर गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून २ लाख ७७ हजार ९०० रुपये दंड वसूल केला, तर विनामास्क फिरणाऱ्या ३२५ जणांकडूनही ८० हजार ७०० रुपये दंड वसूल केला. अशा या बेशिस्त नागरिकांवर कारवाईची मोहीम अधिक कडक करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.