कोल्हापूर : कोल्हापुरातील उद्योजकांची निर्यात वाढविण्यासाठी फेडरेशन आॅफ इंडियन एक्स्पोर्ट आॅर्गनायझेशन (फिओ) सहकार्य करेल, अशी ग्वाही ‘फिओ’, मुंबईच्या सहसंचालक चंदा हळदणकर यांनी दिली. कोल्हापूर चेंबर, इंजिनिअरिंग असोसिएशन, स्मॅक, गोशिमा, मॅक व आय.आय.एफ. यांच्यावतीने मंगळवारी रामभाई सामाणी हॉल येथे आयोजित ‘आयात-निर्यात’ कार्यशाळेत त्या बोलत होत्या. चंदा हळदणकर म्हणाल्या, उद्योजकांनी आपल्या उत्पादनांची निर्यात वाढविण्यासाठी आयात व निर्यात व्यवस्थापन पद्धतीची माहिती करून घेणे गरजेचे आहे. निर्यात कोणत्या उत्पादनांची करावी, ती कशी करावी, कोणत्या देशात करावी, करार करताना कोणती काळजी घ्यावी. निर्यात नोंदणी प्रक्रिया, कागदपत्रांची पूर्तता कशी करावी याबाबत ‘फिओ’ नेहमीच मार्गदर्शन करते. ‘फिओ’ गेले ५० वर्षे हे काम करत असून भारताच्या निर्यातवाढीमध्ये संस्थेचे योगदान मोठे आहे. कोल्हापुरातील औद्योगिक व शेतीपूरक उत्पादनांना परदेशात मोठी बाजारपेठ उपलब्ध असून निर्यात व्यवस्थापनाच्या अज्ञानामुळे अनेक सवलती व सुविधांचा फायदा होत नाही. त्यासाठी उद्योजकांनी निर्यात व्यवस्थापनाची माहिती करून घेणे गरजेचे आहे. ‘फिओ’तर्फे निर्यातदारांसाठी आयोजित होत असलेल्या विविध कार्यशाळा, परिंसंवाद व उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन ‘कोल्हापूर चेंबर’चे उपाध्यक्ष व ‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी केले. ए. टी. सी. लॉजिस्टिकचे व्यवस्थापक प्रदीप कुलकर्णी यांनी कस्टम कागदपत्रांची पूर्तता कशी करावी व परदेशात माल कसा पाठवावा याबाबत मार्गदर्शन केले. शामराव विठ्ठल बँकेचे व्यवस्थापक शीतलनाथ मेंच यांनी निर्यातीसाठी बँकेतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती दिली. यावेळी कोल्हापूर, सांगली, मिरज, पुणे येथील निर्यातदार उपस्थित होते. दरम्यान, आज, बुधवारीही दिवसभर निर्यातीबाबत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केल्याची माहिती कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सच्यावतीने देण्यात आली. निर्यातीसाठी करसवलती!विशिष्ट उत्पादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहरांना त्या उत्पादनांच्या निर्यातीसाठी सवलत योजना, कर सवलत, निर्यात प्रोत्साहन अशा सवलती मिळत असल्याचे निर्यात सल्लागार नकुल बी. यांनी सांगितले.
निर्यातीबाबत ‘फिओ’चे सहकार्य
By admin | Published: October 19, 2016 12:28 AM