कोल्हापूर : सीपीआरमध्ये सप्टेंबर २०२० मध्ये लागलेल्या आगीनंतर जिल्ह्यातील प्रमुख रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले; मात्र त्यात सुचवलेल्या उपाययोजना करण्यासाठी तब्बल १९ कोटी ९४ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. यासाठी निधी मात्र कुठून आणि कधी मिळणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
कोणतीही आगीची दुर्घटना घडली की फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याच्या घोषणा केल्या जातात. मात्र दुसरी दुर्घटना घडेपर्यंत त्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. सीपीआरमध्ये २८ सप्टेंबर २०२० रोजी पहाटे लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू झाला. यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सीपीआर, सेवा रुग्णालय, कसबा बावडा, उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज आणि इंदिरा गांधी रुग्णालय, इचलकरंजी या जिल्ह्यातील शासकीय प्रमुख रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश करण्यात आला आहे.
यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून सीपीआर आवारातील सर्व इमारतींचे फायर ऑडिट करण्यात आले. हा अहवाल ८ ऑक्टोबर २०२० रोजी सीपीआरकडे पाठवण्यात आला. यामध्ये २६ इमारतींमध्ये सुमारे २०० सुधारणा सुचवल्या. यानंतर याचा सर्व अहवाल करून अंदाजपत्रक तयार करण्यात आले. ते मुख्य अभियंता, विद्युत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे पाठवण्यात आले. त्यांनी काही त्रुटी काढून पाठवलेला प्रस्ताव आता दुरूस्तीसह अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम अधिकारी, पुणे विद्युत मंडळ यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी १६ कोटी ११ लाखांचा खर्च येणार आहे, तर शेंडा पार्क येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या फायर ऑडिटमधील उपाययोजनांसाठी ३ कोटी ८२ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.
चौकट
अधिष्ठाता यांनी घेतली बैठक
अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी सोमवारी सकाळी सुमारे पाऊण तास नवजात शिशु विभागामध्ये संबंधितांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी भंडारा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सक्त सूचना दिल्या. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय बरगे, बालरोगतज्ज्ञ डॉ. सुधीर सरवदे उपस्थित होते.
चौकट
नवजात शिशु विभागातच उघडा आहे बॉक्स
सीपीआरच्या नवजात शिशु विभागातच आतील जुने वायरिंग दिसणारा बॉक्स उघडाच आहे. त्याच्याशेजारी नवीन फिटिंग केलेला बॉक्सही उघडा आहे. एकूणच सीपीआर आवारातील अनेक इमारतींमध्ये जुन्या वायरिंगला जोडून नवे फिटिंग, उघड्या मोठ्या केबल्स, लोंबकळणाऱ्या वायर्स असे चित्र दिसून येत आहे. जुन्या इमारतीमधील अनेक दालनांमध्ये वायर्सचा गुंतावळा पाहावयास मिळतो.
फायर ऑडिटसाठी येणारा खर्च
१ सीपीआर मुख्य इमारत ८ कोटी ८१ लाख ३५ हजार रुपये
२ गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय १ कोटी ७५ लाख २१ हजार
३ कसबा बावडा सेवा रुग्णालय ७५ लाख ५५ हजार
४ इंदिरा गांधी, इचलकरंजी ४ कोटी ७९ लाख ६० हजार
५ शेंडा पार्क वैद्यकीय महाविद्यालय ३ कोटी ८२ लाख ५६ हजार
एकूण १९ कोटी ९४ लाख २९ हजार
यामध्ये टेरेसवर पाण्याच्या टाक्या, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठीचे मार्ग यासह अन्य उपाययोजनांचा समावेश आहे.
चौकट
दुर्घटनेनंतर ही झाली कामे
एकीकडी फायर ऑडिटचा प्रस्ताव अजून मंजूर व्हायचा आहे. त्यासाठी निधीची तरतूद नाही. त्यामुळे हा प्रस्ताव लवकर वास्तवात येणार नाही. परंतु सीपीआरमधील आगीच्या दुर्घटनेनंतर तातडीने काही विद्युतीकरणाची कामे मात्र तातडीने करण्यात आली आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भवानी मंडपमधील विद्युत शाखेने तातडीने कार्यवाही केली. सीपीआरमधील सर्व फिडर पिलर पूर्णपणे रंगवून त्यावर धोकादायकचे फलक लावले. स्वीच गियर खराब झालेला फिडर पिलर नवीन बसवला. मेन स्वीच गार्ड स्वच्छ केला. मेन सबस्टेशनमध्ये खराब वायरिंग काढून नवे वायरिंग केले. सर्व फिडर पिलरमधील फ्यूज वायर काढून एचआरसी फ्यूज बसवल्या, गायनॅक इमारतीमधील खराब स्वीचगियर बलून नवीन एसीबी पॅनेल बसवण्यात आले आहे.
११०१२०२१ कोल न्यू वर्क ०१
११०१२०२१ कोल न्यू वर्क ०२
सीपीआरमध्ये सप्टेंबर २०२० मध्ये लागलेल्या आगीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही कामे केली आहेत.
११०१२०२१ कोल सीपीआर वायरिंग ०१
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयाजवळील दालनांमध्ये हा तारांचा गुंता
११०१२०२१ कोल सीपीआर वायरिंग ०२/०३/०४
शिशु विभागाच्या इमारतींमागेही मोठया केबल उघड्यावर असून, काही ठिकाणी त्याच ठिकाणी ड्रेनेजचे पाणी सोडले जात आहे.
११०२२०२१ कोल सीपीआर वायरिंग ०५
नवजात शिशु विभागामध्ये चक्क विद्युतीकरणाचा हा बॉक्स उघडा आहे.
छाया आदित्य वेल्हाळ, समीर देशपांडे