कोल्हापूर : विकास योजनेतील रस्त्यात बाधित होणाऱ्या कसबा बावडा येथील जागेचा टीडीआर (हस्तांतरणीय विकसन हक्क) मिळत नसल्यामुळे निराश झालेल्या आनंदा कृष्णात करपे (रा. धनगर गल्ली, कसबा बावडा) या युवकाने गुरुवारी दुपारी महानगरपालिकेसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला; परंतु जागरूक अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
गुरुवारी दुपारी करपे महापालिका कार्यालयासमोर आला. ‘माझ्या हक्काच्या जागेचा मोबदला जर मला मिळणार नसेल तर मला जगायचेच नाही,’असे तो मोठ्याने ओरडून सांगत होता. तो आल्याची माहिती कळताच अग्निशमनच्या जवानांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो तेथून पळून गेला. जवानांनी पाठलाग करीत काळाईमाम तालमीजवळ त्याला ताब्यात घेतले. मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले यांनी त्यांच्या कक्षात आनंदा करपे याची झडती घेऊन त्याची तपासणी केली. त्याच्याकडून पेट्रोलची बाटली ताब्यात घेतली. नंतर त्याला आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासमोर उभे करण्यात आले.
आरक्षित क्षेत्र अधिग्रहण करावे आणि त्याचा मोबदला द्यावा अन्यथा मला आत्मदहन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही व त्या परिणामांची जबाबदारी महापालिकेवर राहील, असा इशारा ४ मार्च रोजी एका पत्राद्वारे करपे याने दिला होता. गुरुवारी महापालिकेची सभा असल्याचे पाहून त्याने महापालिका मुख्य कार्यालयासमोर येऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला; पण अग्निशमन दलाच्या जवानांती तो हाणून पाडला.टीडीआर देण्यात अडवणूक?रीतसर टीडीआर देण्याच्या कामात नगररचना विभागाकडून जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्याचा आरोप केला जातो. यापूर्वी काही प्रकरणांत फसवणूक करून टीडीआर लाटल्याचे उघडकीस आले आहे; परंतु ज्यांना टीडीआर देणे कायदेशीर आहे, अशा घटकांची जाणीवपूर्वक पिळवणूक केली जात असल्याची चर्चा आहे.