कोल्हापूर : महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखविलेल्या कर्तव्य दक्षतेमुळे ६० वर्षांच्या एका भ्रमिष्ठ महिलेचे प्राण वाचले. नागरिकांनी कळविल्यामुळे अग्निशमन दलाचे जवान तातडीने रंकाळा तलावाजवळ येऊन त्यांनी त्या विक्षिप्त महिलेस पाण्यात पडण्यापासून वाचविले.मंगळवारी दुपारी मनोविकाराने ग्रस्त असलेली ६० वर्षीय एक महिला रंकाळा तलावाच्या काठावर जाऊन पाण्यात हात घालून चित्रविचित्र हावभाव करत होती. तिचा तोल जाऊन पाण्यात पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अग्निशमन दलास कळविले. त्यावेळी अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी आले; त्यावेळी संबंधित महिला चित्रविचित्र हावभाव करत पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करत होती.
कोणत्याही क्षणी ती पाण्यात पडण्याची शक्यता होती, त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला तातडीने ताब्यात घेऊन उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखविली नसती, तर ती महिला पाण्यात पडली असती. या मोहिमेत उप मुख्य फायर आॅफिसर तानाजी कवाळे, भगवंत शिंगाडे, चालक संदीप पाटील, शैलेश कांबळे, पुंडलिक माने हे जवान सहभागी झाले होते.