नवे पारगाव : मनपाडळे (ता. हातकणंगले) येथील मातंग वस्तीत जनावरांच्या छपराला लागलेल्या आगीत तीन जनावरे जळून खाक झाली. या घटनेत वैरण, धान्य, प्रापंचिक साहित्य असे मिळून चार लाखांचे नुकसान झाले. आग विझवण्याच्या प्रयत्नात महिला जखमी झाली. शनिवारी चारच्या सुमारास घटना घडली.
अधिक माहिती अशी : मनपाडळे गावाच्या दक्षिणेस सुमारे दोन किलो मीटरवर मातंग समाजाची शेती व वस्ती आहे. येथे दिनकर धोंडीराम दबडे व तानाजी धोंडीराम दबडे यांचीही शेती व जनावरांचे गोठे आहेत. दिनकर दबडे यांच्या छपरास आग लागल्याचे शेजारी शेतीत पाणी पाजत असलेल्या वसंत दबडे यांच्या निदर्शनास आले. जवळच्या गवताच्या गंजीने पेट घेतला. आगीने रुद्र रूप धारण केले. छाया दबडे यांच्या हाताला भाजून त्या जखमी झाल्या.
आगीची माहिती समजताच सरपंच रायबाराजे शिंदे, उपसरपंच उल्हास वाघमारे व ग्रामस्थ मदतीसाठी गेले. वारणेच्या अग्निशामन दलाने आग आटोक्यात आणली. आगीत चार लाखांचे नुकसान झाल्याचे तलाठी अजय नाईक व पोलीस पाटील माणिक पाटील यांनी पंचनाम्यात नोंदवले आहे.
दिनकर दबडे यांची गाय व म्हैस तर तानाजी दबडे यांची म्हैस मृत झाली.
फोटो ओळी : मनपाडळे (ता. हातकणंगले) येथे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेला दिनकर व तानाजी दाभाडे यांचे जनावरांचे गोठे व जळालेली जनावरे.(छाया : विजय तोडकर)