राजाराम पाटील -इचलकरंजी -नगरपालिका म्हणजे नागरिकांच्या मूलभूत नागरी सेवा-सुविधा देणारी संस्था असून, दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक कामे येथे होत असतात. पाणी, आरोग्य, स्वच्छता, रस्ते याचबरोबर पालिकेची आर्थिक घडी याकडेही लक्ष देणे आवश्यक असते. याशिवाय अग्निशमन, उद्याने, बालशिक्षण, सुशोभीकरण अशीसुद्धा पालिकेची कर्तव्ये आहेत. याबाबत ठोस उपाययोजना, नियोजन, सुसूत्रता आणणारी यंत्रणा पालिकेकडे हवी. मात्र, त्याबाबत परवडच सुरू आहे.इचलकरंजी वस्त्रोद्योगातील अग्रेसर शहर असून, तीन लाख लोकसंख्या असलेल्या वस्त्रनगरीत दीड लाख यंत्रमाग व त्याला पूरक असे सूतगिरण्या, सायझिंग, प्रोसेसिंग, रंगण्या असे छोटे-मोठे उद्योग आहेत. सायझिंग व प्रोसेसिंग कारखान्याच्या बॉयलरसाठी लागणारा बगॅस उन्हाळ्यात ज्वालाग्रही बनतो. यंत्रमाग, सायझिंग, प्रोसेसिंग कारखान्यांमध्ये सुताची गुंजसुद्धा झटकन पेट घेणारी असते. अगदी विजेच्या शॉर्टसर्किटनेही गुंज पेटते आणि कारखान्यातील सूत व कापड आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने प्रसंगी कोट्यवधींचे नुकसान होते. सूतगिरण्यांमधील कापूस आणि सुताची गुंजसुद्धा ज्वालाग्रही असते.अशा कारखान्यांतून काहींना काही कारणाने आग लागण्याचे प्रसंग उद्भवतात. याशिवाय इचलकरंजी शहराच्या आसपास लक्ष्मी औद्योगिक वसाहत, पार्वती को-आॅप. इंडस्ट्रियल इस्टेट, खंजिरे औद्योगिक वसाहती अशा औद्योगिक वसाहतींत अनेक कारखाने आहेत. तेथेही अग्निशमनचे काम इचलकरंजी नगरपालिकेच्या अग्निशामक दलालाच करावे लागते. या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील अग्निशामक दलाकडे चार गाड्या आहेत. त्यापैकी दोन गाड्या स्टेशन रोडवरील केंद्रात व दोन गाड्या जुन्या नगरपालिकेतील केंद्रात आहेत.वस्त्रनगरीसाठी अग्निशामक दलाचे अनन्यसाधारण महत्त्व असूनही पुरेशा चालकाअभावी तीनच गाड्या चालू ठेवाव्या लागतात. अग्निशामक विभागाकडे सात चालक व १४ फायरमन आहेत. त्यापैकी स्टेशन रोडवरील केंद्राकडे ३ चालक व ६ फायरमन, जुन्या नगरपालिकेकडील केंद्राकडे ३ चालक व ६ फायरमन रोज कार्यरत असतात. १ चालक व २ फायरमन हे सुटी सोडविण्याचे काम करतात. विशेष म्हणजे १४ फायरमनपैकी फक्त तिघेजण प्रशिक्षित आहेत. बाकी अकराजण क्लिनर असून, बढतीवर फायरमन झाले आहेत. चारीही गाड्या चालू ठेवण्यासाठी एकूण १४ चालक व ४२ फायरमनची आवश्यकता आहे. यावरून अग्निशामकसारख्या गंभीर बाबींवर नगरपालिकेतील लोकप्रतिनिधी व प्रशासनाची अनास्था व बेपर्वाई दिसून येते. (क्रमश:)सर्व कामे बाहेरून ‘टक्केवारी’वरनगरपालिकेच्या वाहन विभागाकडील गॅरेजकडे १ अधीक्षक व २ मेकॅनिक आहेत. त्यातील एकाला फायरमन पदावरून बढती दिली आहे. चाकांचे पंक्चर काढणे, गाडी धुणे, ढिले नटबोल्ट आवळणे याव्यतिरिक्त सर्व प्रकारची कामे ‘बाहेरून’ करून घेतली जातात. त्यामध्येसुद्धा टक्केवारी बोकाळली असल्याची चर्चा आहे.स्टेफनी, जॅक, टुलबॉक्स नसलेल्या गाड्याअग्निशामक दलाकडे असलेल्या चारीही गाड्या स्टेफनी नसलेल्या जॅकविरहित आणि टुलबॉक्स नसलेल्या आहेत. विशेष म्हणजे या गाड्या नव्या असतानाच स्टेफनी, जॅक, टुलबॉक्स बेपत्ता असल्याचेही बोलले जाते. त्यावेळी गाड्या जमा करून घेताना त्याची खातरजमा झाली नाही का, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.चौथ्या गाडीचा वापर टॅँकर म्हणूनइचलकरंजीतील जुन्या नगरपालिकेमधील केंद्रात एकच अग्निशामन दलाची गाडी उभी असून, केंद्रातील दुसरा गाळा गाडीच्या प्रतीक्षेत आहे.अग्निशामक दलाकडील चौथ्या गाडीचा वापर पाण्याच्या टॅँकरसारखा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.ही गाडी शहरातील सार्वजनिक शौचालये व मुताऱ्या धुण्यासाठी वापरली जात आहे. अग्निशामक दलाच्या सुसज्ज गाडीचा वापर असाही होत असल्याची चर्चा शहरातील नागरिकांतून होत आहे.
वस्त्रनगरीची अग्निशमन यंत्रणा विकलांग
By admin | Published: November 05, 2014 12:12 AM