कुरुंदवाड : शहराच्या कचरा डेपोतील आगीमुळे लगतचा सुमारे पाच एकर क्षेत्रातील ऊस जळाला. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. आगीत चार शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझविली. पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे नगरपालिका प्रशासन आणि कचरा ठेकेदाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, या नुकसानीविरोधात शेतकऱ्यांनी कुरुंदवाड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, तर बुधवारी दुपारी नुकसानग्रस्त व कचरा डेपो परिसरातील शेतकऱ्यांनी मुख्याधिकारी निखिल जाधव यांना जळीत उसाची नुकसान भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन दिले.
शहरातील संकलित झालेला कचरा मजरेवाडी (ता. शिरोळ) हद्दीतील पालिकेच्या कचरा डेपोमध्ये टाकला जातो. कचरा ठेकेदाराकडून सुका व ओला कचरा विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावली जाते. घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिका प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्च करते.
कचरा जाळण्यासाठी मंगळवारी कचरा डेपोला आग लावण्यात आली होती. कचरा डेपोलगत शहरातील शेतकऱ्यांबरोबर मजरेवाडीतील शेतकऱ्यांची शेती आहे. शिवाय कचरा डेपोला कंपाउंड नसल्याने कचऱ्याला लागलेली आग वाऱ्याने ऊस पिकात उडून गेल्याने प्रकाश राऊ चव्हाण, जयश्री सुरेश माळी, पद्मावती अजित माळी व रावसाहेब महादेव माळी यांच्या मालकीच्या (गट नं. १२२) शेतातील सुमारे पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे.
-------------------------
चौकट - शेतकऱ्यांतून तीव्र संताप
पालिकेने शहर स्वच्छतेचा ठेका तानाजी पवार यांच्या भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट कंपनी पुणे या कंपनीला देण्यात आला आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. ठेकेदाराच्या कारभारावर शहरवासीयांसह काही नगरसेवकही नाराज आहेत. कचरा पेटल्याने ऊस पेटल्याबाबत त्यांच्याशी संपर्क केला असता कचराच पेटला नाही, असे सांगत खोटे बोलून जबाबदारी झटकल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
फोटो - २८०४२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - कुरुंदवाड येथील कचरा डेपोतील आगीमुळे लगतचा आडसाली ऊस जळून खाक झाला.