कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील मुल्लाणी फुडस मॉल या चिरमुरे, फुटाणे घाऊक विक्रेत्याच्या दुकानास शुक्रवारी मध्यरात्री शार्टसर्किटने आग लागली. ही आग अग्निशमन दलाने चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटेच्या सुमारास विझविली. या आगीत या दुकानाचे सुमारे साडेपाच लाखांचे नुकसान झाले.लक्ष्मीपुरीतील रिलायन्स मॉल शेजारी मन्सूर बापूसो मुल्लाणी (रा. जवाहरनगर) यांचे मुल्लाणी फुडस मॉल नावाचे चिरमुरे, फुटाणे व अन्य खाद्यपदार्थांचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी रात्री स्वत: मन्सूर व त्यांची मुले सोहेल व इरफान हे नऊ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते.
रात्री पावणे बाराच्या सुमारास दुकानासमोर राहणाऱ्या नितीन कोगनोळे यांनी फुडसचे मालक मुल्लाणी यांना दुकानातून धूर येत असल्याची माहिती दिली. ते मुलांसह दुकानात आले. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक सुनीता शेळके, पोलीस नाईक सुधीर हेगडे-पाटील व अन्य सहकारी गस्त घालत होते. तेही दाखल झाले.
स्वत: मुल्लाणी व स्थानिक नागरिकांनी दुकानाचे शटर उघडले. यावेळी त्यांना इन्व्हर्टरला शार्टसर्किटने आग लागल्याचे दिसून आले. तळघरात प्लास्टिक पोत्यांमध्ये ठेवलेल्या चिरमुऱ्याच्या साठ्यास आग लागल्यामुळे खालूनही धुराचे लोट बाहेर येऊ लागले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणली. शुक्रवारी दिवसभर दुकानातील नुकसान झालेला माल काढण्याचे काम सुरू होते.