कसबा सांगाव/हुपरी : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील नागरिका एक्स्पोर्ट लिमिटेड या कंपनीत सकाळी १०.४५ वाजता आकस्मिक लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. आगीने रौद्ररूप धारण केल्याने चार अग्निशमन दलाचे व तीन खासगी पाण्याच्या टॅँकरच्या साहाय्याने ही आग सुमारे चार तासांनंतरसुद्धा आटोक्यात येऊ शकली नव्हती.याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, गत दोन दिवसांपासून बॉयलर व ब्लिचिंगचे काम वार्षिक तपासणीसाठी बंद होते. मात्र, इतर सर्वच विभाग चालू होते. रविवारी सकाळच्या शिफ्टमध्ये सुमारे ९२ कर्मचारी कामावर उपस्थित होते. कंपनीच्यावतीने सुरक्षा सप्ताह चालू असल्याने आग लागल्यानंतर ती आटोक्यात कशी आणावी, याचे प्रात्यक्षिक या सर्व कामगारांना येथील एचआर विभागामार्फत दाखविण्यात येत होते. याचवेळी डार्इंग व ब्लिचिंगचे रॉ मटेरियल विभागात आग लागल्याचे कामगारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केला. त्या ठिकाणी असणारे आग विझविणारे सिलिंडर फोडून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीने रौद्ररूप धारण केल्याने अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले. कोल्हापूर महानगरपालिका, कागल नगरपालिका, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील दोन, जवाहर साखर कारखाना व खासगी चार अशा नऊ अग्निशमन बंब व पाणीपुरवठा करणारे टॅँकर, आदींना पाचारण करण्यात आले. तरीही आग आटोक्यात येत नव्हती. या आगीमध्ये स्टेशनरी, साहित्य, यार्न (धागे) व कापडाचे गठ्ठे, इलेक्ट्रिक सर्व साहित्य असे साहित्य भक्ष्यस्थानी पडले. ही आग इतकी भयानक होती की, क्षणार्धात खिडक्यांच्या काचा व वरील पत्रे वितळू लागले होते. आग विझविण्यासाठी नागरिकांबरोबरच इन्डोकाऊन्ट कंपनीच्या सेफ्टी विभागातील कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.
‘नागरिका एक्स्पोर्ट’मध्ये आग
By admin | Published: March 05, 2017 11:33 PM