इचलकरंजी : पंचगंगा फॅक्टरी-यड्राव मार्गावर असलेल्या राधा-कन्हैय्या टेक्स्टाईल प्रोसेसर्सला शॉर्टसर्किटने भीषण आग लागून सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले. आगीत प्रोसेसर्समधील मशिनरी, कापडाच्या गाठी, रसायन व अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. सुमारे ४० बंब पाणी मारून अग्निशामक दलाच्या जवानांच्या आठ तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गोरखनाथ डाके यांच्या मालकीचा राधा-कन्हैय्या नावाने कापडावर प्रक्रिया करणारा प्रोसेसर्स कारखाना आहे. सोमवारी सुटी असल्याने प्रोसेसर्स बंद होते. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास प्रोसेसर्सच्या छतातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसले. त्यांनी वॉचमनला ही माहिती दिली. वॉचमनने आत जाऊन पाहिले असता आग लागल्याचे दिसले. त्याने तत्काळ या घटनेची माहिती डाके यांना दिली. डाके यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.आगीची भीषणता वाढल्यानंतर लांबूनच आगीचे लोट दिसत होते. कापडावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारे केमिकल व कापडाच्या गाठी मोठ्या प्रमाणात असल्याने कमी वेळेत आग मोठ्या प्रमाणात वाढली. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. आग विझवत असताना अचानक आगीच्या झळांमुळे प्रोसेसर्सचे छतही खाली कोसळले. त्यामुळे आग विझविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. नगरपालिकेच्या चारही बंबांचे पाणी मारून आग विझविण्याचे काम सुरू होते. मात्र, आग आटोक्यात न आल्याने परिसरातील दत्त साखर कारखाना आणि संजय घोडावत ग्रूपच्या अग्निशमन गाड्याही बोलाविण्यात आल्या. सर्वच गाड्या वारंवार फेऱ्या मारून परिसरातून पाणी भरून आणून त्याचा मारा आगीवर करीत होते. आग विझविण्यासाठी जवानांसह प्रोसेसर्समधील कर्मचारी, परिसरातील नागरिकांनी प्रयत्न केले. सुमारे आठ तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. या आगीत सुमारे सहा लाख मीटर कापडाचे तागे, प्रोसेसिंग केलेल्या कापडाच्या गाठी, ड्रायर, प्रिंटिंग, क्लोअरिंग मशीन, पिचिंग मशीन, केमिकल टेस्टिंग लॅब, त्यातील सर्व साहित्य जळाले. आगीची तीव्रता इतकी होती की, लोखंडी साहित्यही वितळत चालले होते. आगीमुळे सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद कृष्णात भगवंत डाके यांनी दिली आहे. (वार्ताहर)
प्रोसेसर्सला आग; तीन कोटींचे नुकसान
By admin | Published: June 10, 2015 12:24 AM