इचलकरंजी : गंगानगर (ता.हातकणंगले) येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना परिसरात असलेल्या दोन ऊसतोड मजुरांच्या खोपट्यांना आग लागली. यामध्ये दोन रेडकू व एका म्हशीचा मृत्यू झाला. तसेच प्रापंचिक साहित्यांसह सुमारे लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना गुरूवारी दुपारी घडली. या आगीची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.सध्या ऊसतोड हंगाम सुरू असून, साखर कारखान्यावर उस्मानाबाद, बीड, लातूर, सोलापूर अशा विविध जिल्ह्यांसह कर्नाटकातून ऊसतोड मजूर कामासाठी आले आहेत. पंचगंगा साखर कारखाना परिसरात ऊसतोड मजुरांना राहण्यासाठी जागा दिली आहे. त्यामध्ये ऊसतोड मजुरांनी आपली खोपटी बांधून वास्तव्यास आहेत.
यातील लक्ष्मण भैरवाळ व गणेश भैरवाळ यांच्या खोपट्यांना गुरूवारी दुपारी आग लागली. आगीमध्ये यामध्ये दोन रेडकू व एका म्हशीचा मृत्यू झाला. तसेच प्रापंचिक साहित्य जळाले. त्यामध्ये काही रोख रक्कम व दागिने जळाल्याची घटनास्थळी चर्चा सुरू होती. पंचनाम्यानंतर पोलिस ठाण्यात नोंद झाल्यानंतरच नुकसानीचा आकडा स्पष्ट होईल.