येथील पालिकेच्या इमारतीमध्ये दुकान गाळे आहेत. यामध्ये आठ नंबरच्या दुकान घारसे बंधू यांचे किसान शेती भांडार असे बियाणे, खते विक्रीचे दुकान आहे. या दुकानाशेजारीच घारसे यांचे गोडावून आहे. दरम्यान, आज पहाटे अचानक आग लागली.
आगीने रौद्र रूप धारण केले होते. बँकेच्या एटीएमच्या सुरक्षारक्षकाला आग लागल्याचे लक्षात आले. त्याने विजय झगडे यांच्या माध्यमातून तातडीने संपर्क साधून माहिती दिली. तसेच वडगाव पालिकेच्या अग्निशमन दलानेही धाव घेतली. खासगी पाणी टँकरही घटनास्थळी आले. अखेर अथक प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. तसेच पालिकेच्या जेसीबी व दोन ट्रॅक्टरच्या मदतीने गोडावूनमधील जळीत व चांगले साहित्य बाहेर काढण्यात आले.
नगराध्यक्ष मोहनलाल माळी, अभिनंदन सालपे, सुधाकर पिसे आदींसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे प्रशांत आवळे, गणेश नायकवडी, अंकुश कदम, केतन धनवडे, सुशांत आवळे, महेश पाटील, अजित पाटील यांनी मदतकार्यात सहकार्य केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात खते, बियाणे, कीटकनाशके, रासायनिक औषधे आदींचे नुकसान झाले, तर काही साहित्य वाचविण्यात यश आले. या आगीत सुमारे २० लाखांचे नुकसान झाल्याचे फिर्यादित सदाशिव पांडुरंग घारसे यांनी म्हटले आहे.
आगीची माहिती समजताच शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. तसेच आगीत जळालेले साहित्य बाहेर काढण्यासाठी पालिका कर्मचारी तसेच शहरातील काही तरुणांनी सहभाग घेतला.
आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले साहित्य सात ट्रॅक्टरमधून हलविण्यात आले.
चौकट
अगदी हाकेच्या अंतरावर असलेला अग्निशमन दल तासाने घटनास्थळावर आला. अत्यावश्यक सेवेतील अग्निशमन दल हा रिकामा होता. आगीची वर्दी मिळाल्यानंतर पाणी भरण्यास गेला होता. त्यानंतर आगीच्या ठिकाणी आला. त्यामुळे नाराजी व्यक्त होत होती.
फोटो ओळ :
पेठवडगाव येथील पालिका चौकातील किसान शेती भांडारच्या गोडावूनला आग लागली होती. अशी आग पसरली होती तर आगीत नुकसान झालेले साहित्य जेसीबी मशीनच्या मदतीने काढण्यात आले. (छाया : सुहास जाधव)