कोल्हापूर : मोबाईल चोरल्याच्या संशयावरून बहिरेश्वर (ता. करवीर) येथे चुलत्यानेच गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. २३) घडला. या प्रकरणी संशयित सुभाष शंकर पडवळे (रा. बहिरेश्वरवाडी) याला करवीर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. त्याच्याकडून १२ बोअरची बंदूक जप्त केली असल्याचे करवीर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले.बहिरेश्वरवाडी (ता. करवीर) येथील विवेक विश्वास पडवळे हे कुटुंबासोबत राहतात. त्यांचे चुलते संशयित सुभाष पडवळे यांचा दोन दिवसांपूर्वी मोबाईल चोरीला गेला. तो मोबाईल पुतण्या विवेक यानेच चोरल्याचा त्यांना संशय होता. यातूनच सोमवारी (दि. २३) सकाळी संशयित सुभाष हा परवाना असलेली १२ बोअरची बंदूक घेऊन विवेक यांच्याकडे आला. त्यावेळी मोबाईल चोरल्यावरून या दोघांत शाब्दिक वादावादी झाली.
यावेळी संतप्त झालेल्या संशयित सुभाषने विवेकवर व हवेत गोळीबार केला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ व दहशत माजली. सुदैवाने विवेक यांना हल्ल्यात कोणतीही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची चौकशी केली.
या प्रकरणी दुपारी विवेक पडवळे यांनी थेट करवीर पोलीस ठाणे गाठून चुलते संशयित सुभाष पडवळे याच्या विरोधात गोळीबार केल्याची तक्रार दिली. त्यानुसार सुभाषवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला रात्री अटक करून त्याच्याकडील बंदूक जप्त केली.संशयित व्हीसीद्वारे न्यायालयातमंगळवारी दुपारी सुभाष पडवळे याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने एक दिवसाची कोठडी सुनावली. याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण करीत आहेत.