कोल्हापूर : औद्योगिक वसाहतीमधील स्क्रॅप खरेदी आणि आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून आदमापुरात त्रिवेणी हॉटेलमध्ये दोन गटात फिल्मी स्टाईलने गोळीबार झाला. शनिवारी (दि. २३) सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या या घटनेत पायाला गोळी लागल्याने श्रीकांत तानाजी मोहिते (वय ३२, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) हा जखमी झाला. पोलिसांनी दोन्ही गटातील दहा जणांना ताब्यात घेतले असून, आणखी चार ते पाच संशयितांचा शोध सुरू आहे. गोळीबारातील शिरोलीचा माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य अविनाश कोळी पसार आहे. जखमी मोहिते याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.घटनास्थळ आणि सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील स्क्रॅप घेण्याच्या कारणावरून शिरोली येथील दोन गटात वाद आहे. गुरूवारी (दि. २१) रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान शिरोलीत दोन गटात मारामारी झाली होती. त्यानंतर अविनाश कोळी याचा गट आदमापुरातील एका हॉटेलमध्ये जाऊन लपला होता. त्यांच्या शोधात शनिवारी सकाळी विनायक लाड-कोळी याच्यासह चौघे आदमापुरातील त्रिवेणी हॉटेलमध्ये गेले. व्हरांड्यातच समोरून येत असलेल्या विरोधी टोळीवर त्यांनी गोळीबार सुरू केला. त्यावेळी प्रत्युत्तर देणारा श्रीकांत मोहिते हा मांडीला गोळी लागल्याने जखमी झाला. चार ते पाच मिनिटांच्या थरारानंतर हल्लेखोर पसार झाले. फिल्मी स्टाईल गोळीबाराने आदमापुरात खळबळ उडाली.दहा संशयित ताब्यातया घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयितांची धरपकड सुरू केली. जखमी श्रीकांत मोहिते याच्यासह ऋषिकेश भोरे, अली तानेखान, अनिकेत कांबळे, प्रसाद कांबळे, अभय उर्फ अभी काळोखे यांना ताब्यात घेतले. या गटाचा प्रमुख अविनाश कोळी याचा शोध सुरू आहे. दुसऱ्या गटाचा प्रमुख विनायक लाड-कोळी याच्यासह अभिजीत लाड-कोळी, नितिकेश राऊत आणि आरिफ वाडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
गुन्हा दाखलअनिकेत सुकुमार लाड उर्फ कोळी याच्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी अभिजीत अनिल कोळी, अविनाश अनिल कोळी, श्रीकांत तानाजी मोहिते, अभय उर्फ अभी एकनाथ काळोखे, वैभव साठे, ऋषिकेश उर्फ प्रताप मोरे, कार्तिक राजूरकर, जॉय भालेराव, अली बालेचान तानेखान, रोहित शहाजी सातपुते, अमोल कोळी, प्रसाद कांबळे आणि अनिकेत आनंदा कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल केला. विरोधी गटाकडूनही याबाबत गारगोटी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.तीन पिस्तुलांचा वापरगोळीबारात तीन पिस्तुलांतून चार गोळ्या झाडल्या गेल्या. हॉटेलमध्ये घुसलेले विनायक लाड-कोळी आणि अनिकेत लाड-कोळी यांनी दोन पिस्तुलांमधून गोळीबार केला. त्याला श्रीकांत मोहिते याने प्रत्युत्तर दिले. पोलिसांनी दोन पिस्तुले आणि चार तलवारी जप्त केल्या. सर्व पिस्तुले विनापरवाना आहेत. निवडणूक सुरू असतानाही जिल्ह्यात अवैध पिस्तुलांचा झालेला वापर धक्कादायक आहे.
कोट्यवधींची उलाढालऔद्योगिक वसाहतीमधील स्क्रॅपची उलाढाल कोट्यवधी रुपयांची आहे. कंपन्यांचे स्क्रॅप घेण्यावरून शिरोलीतील दोन्ही गटात वाद आहे. गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेला हा वाद एकमेकांच्या जीवावर उठला आहे. यातील रोहित सातपुते याच्यासह अनेकजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सातपुते याच्यावर हद्दपारीची कारवाई झाली होती.नेमका वाद काय?आर्थिक वादातून अभिजीत कोळी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अनिकेत कोळीसह त्याच्या मित्रांचा खून करण्याची सुपारी श्रीकांत मोहिते याला दिली होती. याच कारणातून गोळीबाराची घटना घडल्याचे फिर्यादी अनिकेत कोळी याने पोलिसांना सांगितले.