कोल्हापूर : आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून यंदा प्रथमच जिल्हा परिषदेने मतदान केंद्रांवर प्रथमोपचाराची सोय केली होती. या माध्यमातून मंगळवारी (दि. २३) जिल्ह्यात ५९२० जणांवर प्रथमोचार करण्यात आले. या उपक्रमाबाबत मतदारांनी जिल्हा परिषदेला धन्यवाद दिले आहेत.नेहमी निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रांवर सुलभ सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जातात. यंदाही ‘सखी’पासून आदर्श मतदान केंद्रापर्यंत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले होते. यातीलच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक मतदान केंद्रावर अशी १८०७ प्रथमोचार किट्स उपलब्ध करून दिली होती.रणरणत्या उन्हामुळे अनेक ठिकाणी मतदारांना चक्कर येण्यासारखे प्रकार घडले. पायरीवरून उतरताना, चढताना काहीजण पडले. अशा ५९२० मतदारांवर प्रथमोपचार करण्याची कामगिरी या प्रथमोपचार उपक्रमांतर्गत करून दाखविण्यात आली.महिन्याभरापूर्वीपासूनच संबंधितांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्याचा फायदा झाल्याचे यावेळी दिसून आले. तसेच प्राथमिक शाळांमध्ये गेल्या आठ, दहा वर्षांमध्ये जे रॅम्प बांधण्यात आले, त्यांचाही फायदा यावेळी अनेक अपंग मतदारांनी घेतल्याचे स्पष्ट झाले.
शासनाचा आरोग्य विभाग, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायतींनी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअरची सोय केल्याने अनेक अपंगांना ही सेवा दिलासा देणारी ठरली आहे. गाडीतून उतरून मतदानासाठी या उन्हात जाताना होणारा त्रास व्हीलचेअरमुळे सुसह्य झाल्याची भावना अनेकांनी बोलून दाखविली.