कोल्हापूर : युरोपमधील आॅस्ट्रीया या देशामध्ये ७ जुलै रोजी होणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेसाठी कोल्हापुरातील १३ जणांची पहिली तुकडी सोमवारी रवाना झाली.शारीरिक क्षमतेची कस पाहणारी ही स्पर्धा तीन खेळांमध्ये विभागली गेली आहे. प्रथम ३.८ कि. मी. स्विमिंग हे अतिशय थंड पाणी असलेल्या मोठ्या तलावामध्ये २.२० तासांत पूर्ण करायचे असते. त्यानंतर १८० कि. मी.चे चढ-उतार व वळणांवरील आव्हानात्मक सायकलिंगपाठोपाठ ४२ कि. मी. धावणे हे सर्व एकूण १७ तासांत पूर्ण करू शकणाऱ्यालाच आयर्नमॅन हा किताब दिला जातो.या स्पर्धेसाठी कोल्हापुरातून अमर धामणे, उत्तम फराकटे, अतुल पवार, स्वप्निल कुंभारकर (सांगली), उदय पाटील, वैभव बेळगावकर, बसवराज येंटापुरे, अविनाश सोनी, वरुण कदम, यश चव्हाण, बाबासाहेब पुजारी (इचलकरंजी), कुमार ब्रिजवाणी, विरेंद्रसिंह घाटगे हे आॅस्ट्रीया येथे सहभागी झाले आहेत. डॉ. प्रदीप पाटील, बसवराज पाटील, सुप्रिया निंबाळकर, माहेश्वरी सरनोबत, झुंजार सरनोबत हे स्वित्झर्लंड येथील स्पर्धेमध्ये व मुकेश तोतला (इचलकरंजी) हे स्पेन येथील स्पर्धेत सहभागी होत आहेत. सर्व स्पर्धक गेली दीड वर्षे पंकज रावळू, आशिष रावळू, अश्विन भोसले, निळकंठ आकाडे यांचेकडे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.