संदीप बावचे
शिरोळ : राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ४७४ ग्रामपंचायतीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज, सोमवारी छाननी सुरु आहे. मात्र, निवडणुकीआधीच भाजपने जिल्ह्यात पहिला विजयी गुलाल उधळला आहे. सरपंचपदी भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाल्याने गावात एकच जल्लोष झाला.शिरोळ तालुक्यात सतरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सोमवारी झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर राजापुरवाडी सरपंच पदासाठी भाजपाचे उमेदवार रावसाहेब रामू कोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. अर्ज माघारीनंतर अधिकृत घोषणा होणार आहे. सोमवारी छाननीनंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करुन जल्लोष केला. कोळी यांच्या रूपाने भाजपाने थेट सरपंच पदाचे खाते उघडले आहे.यावेळी शिरोळ येथे भाजपा युवा मोर्चाच्यावतीने रावसाहेब कोळी व ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड अभिजित रामचंद्र कोळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव म्हणाले, भाजपा पक्षाचा सरपंच बिनविरोध करुन सर्वप्रथम जिल्ह्यात खाते खोलले आहे. तालुक्यात अन्य ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मित्र पक्षासोबत आघाडी करुन भाजपाने बहुतांशी सरपंच व सदस्य निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. यावेळी विजय आरगे, पोपट पुजारी, गजानन संकपाळ, पंडीत काळे, इम्रान अत्तार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.