कोल्हापूर : अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठीची एमएचटी-सीईटीची ऑनलाईन परीक्षा आज, सोमवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी विविध बारा केंद्रांवरून एकूण ११५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दि. २० ऑक्टोबरपर्यंत परीक्षा चालणार आहे.
या सीईटी परीक्षेचा पहिला टप्पा दि. १ ते ९ ऑक्टोबरदरम्यान झाला. त्यात वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्राच्या प्रवेशासाठी एकूण ७३४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या सीईटीचा दुसरा टप्पा सोमवारी सुरू झाला. त्यासाठी एकूण ११,०५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी एकूण ११५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात सकाळी ९ ते दुपारी १२ या पहिल्या सत्रात ५६७ जणांनी, तर दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच या दुसऱ्या सत्रामध्ये ५७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या दोन्ही सत्रांसाठी ३९१ विद्यार्थी गैरहजर राहिले.
या परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपातील २०० प्रश्न आहेत. त्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांवरील प्रश्नांचा समावेश आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या निकषाचे पालन करून परीक्षा घेण्यात येत आहे.