कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्यांचे साहित्य परत देण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू केली. पहिल्या दिवशी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील सुमारे १२५ विद्यार्थ्यांना साहित्य वितरीत केले. शनिवार (दि. १९)पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे.
कोरोनामुळे विद्यापीठाच्या वसतिगृहातील सर्व विद्यार्थी हे आपापल्या गावी गेले होते. मात्र, त्यांनी वसतिगृहातील पुस्तके, नोट्स, आदी साहित्य नेले नव्हते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने विद्यापीठातील मुलांची आणि तंत्रज्ञान अधिविभागातील सर्व वसतिगृहे ही संस्थात्मक अलगीकरण आणि कोरोना रुग्णांच्या व्यवस्थेसाठी ताब्यात घेतली. त्यामुळे विद्यापीठाने प्रशासनाने या विद्यार्थ्यांचे साहित्य संकलित करून ते वसतिगृहातील काही खोल्यांमध्ये ठेवले होते.
मात्र, आता अंतिम सत्राच्या परीक्षा होणार असल्याने आणि प्रथम, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वसतिगृहातील साहित्याची आवश्यकता आहे. ते लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने या विद्यार्थ्यांना साहित्य परत देण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता घेऊन ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
वसतिगृहातील एकूण ६५० विद्यार्थ्यांना त्यांचे साहित्य परत दिले जाणार आहे. ही प्रक्रिया शनिवार (दि. १९)पर्यंत चालणार आहे. ज्या विद्यार्थ्याना या मुदतीत विद्यापीठात येणे शक्य होणार नाही, त्यांचे साहित्य एकत्रित ठेवण्यात येईल.- एस. डी. डेळेकर, मुख्य अधीक्षक, वसतिगृह