राम मगदूम- गडहिंग्लज -मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार मिळालेल्या बालकांना हसत-खेळत आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी शासन आग्रही आहे. त्यासाठी नव्या शैक्षणिक वर्षाची सुरूवातच चैतन्यमय व उत्साहवर्धक व्हावी आणि गुणात्मक शैक्षणिक वाटचालीस गती मिळावी म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यभर ‘शाळा प्रवेशोत्सव’ आयोजित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.बालकांचे भावविश्व शाळाच घडविते. सामाजिक विकासात आणि राष्ट्राच्या जडण-घडणीत शाळेचे स्थान अद्वितीय आहे. त्यामुळे शाळांतून दिले जाणारे शिक्षण हे जीवनदायी आहे, अशी शिक्षण हक्क कायद्याची फलनिष्पत्ती आहे. त्याकरिता प्रत्येक मूल पटावर नोंदविले जावे आणि ते नियमित शाळेत यावे यासाठी राज्यभर विविध नवोपक्रम राबविले जात आहेत.२०१५-१६ या वर्षात शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी राज्यातील शाळांमध्ये नव्याने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अभिनव उपक्रम राबविण्याच्या मार्गदर्शक सूचना राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडाविभागाने संबंधित सर्वांना खास अध्यादेशाद्वारे दिल्या आहेत. या कार्यक्रमाचा खर्च सादिलनिधी तसेच सर्वशिक्षा अभियानातून भागवण्यात येणार आहे. विदर्भात २६ जून रोजी आणि उर्वरित महाराष्ट्रात १५ जून रोजी हा कार्यक्रम होईल. त्याच्या आदल्या दिवशी शाळा प्रवेशपात्र बालकांची यादी ग्रामपंचायत व शाळेच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात येईल. घरभेटी व शैक्षणिक पदयात्रेतून पालकांना आवाहन केले जाईल. त्यानंतर शाळा परिसराची स्वच्छता करून सडा-रांगोळी आणि आंब्याच्या किंवा उपलब्ध पाना-फुलांची तोरणे बांधली जातील. वर्गखोल्या सुशोभित केल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा अधिकाधिक आवडू लागतील. शाळेच्या पहिल्या दिवशी सकाळी ७ वाजता बालकांची प्रभातफेरी काढली जाईल. त्यानंतर मोफत पाठ्यपुस्तके व फुले देवून सर्व बालकांचे स्वागत करण्यात येईल. वर्षभर १००% उपस्थिती आणि एकही विद्यार्थी शाळाबाहेर राहणार नाही अशी प्रतिज्ञा उपस्थित सर्व मंडळी करतील. त्यानंतर प्रत्यक्ष वर्ग अध्यापनास प्रारंभ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी व सेवाभावी संस्था (युवक मंडळे, क्रीडामंडळे, बचत गट, महिला मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ) इत्यादी सहभाग घेणार आहेत.हे करतील नवागत बालकांचे स्वागतसरपंच, उपसरपंच, पं.स., जि.प.चे सदस्य व पदाधिकारी, आमदार, खासदार, पालकमंत्री व स्थानिक मंत्री शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत बालकांचे शाळेत स्वागत करतील. त्यानंतर स्थानिक कलाकार अथवा माजी विद्यार्थी शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक़्रम सादर करतील.
पहिला दिवस ‘प्रवेशोत्सव’
By admin | Published: June 10, 2015 11:46 PM