कोल्हापूर : प्रवाशांच्या आग्रहानुसार कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकाने मंगळवारपासून कोल्हापूर-पुणे एसटी बससेवा पुन्हा सुरू केली. कोरोनाचे नियमांचे पालन करत या सेवेच्या पहिल्या दिवशी एकूण ४४ जणांनी प्रवास केला. सांगली, गारगोटी, इचलकरंजी, गडहिंग्लज अशा विविध मार्गांवर १३ एसटी बसेस धावल्या.
कोरोनामुळे गेल्या दीड महिन्यापासून कोल्हापूर ते पुणे, मुंबई मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेसची सेवा बंद होती. प्रवाशांनी या मार्गावरील सेवा सुरू करण्याची मागणी एसटी प्रशासनाकडे केली. त्यानुसार मंगळवारी सकाळी सव्वाआठ वाजता आणि साडेदहा वाजता बसेस कोल्हापूरहून पुण्याला रवाना झाल्या. त्यातून एकूण ४४ जणांनी प्रवास केली. पुण्याहून सकाळी निघालेली बस दुपारी एक वाजता कोल्हापूरमध्ये आली. त्यात २१ प्रवासी होते. दिवसभरात सांगली, इचलकरंजी, कुरूंदवाड, मूरगुड, गारगोटी, राधानगरी, गडहिंग्लज, कागल-रंकाळा या मार्गांवर एकूण १३ बसेस धावल्या. कोरोनाबाबतच्या नियमांचे पालक करत नागरिकांनी या बसेसमधून प्रवास केला. या मार्गांवरील सेवा नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती एसटीचे विभागीय नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.