कोल्हापूर : राज्य सरकारने लागू केलेल्या पहिल्या विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी शनिवारी सारे शहर चिडीचूप झाले. रस्ते निर्मुणष्य होते. चौकाचौकात पोलिसांची पथके होती. नेहमी गजबजलेला महाद्वार, लक्ष्मीपुरी, राजारामपुरीचा परिसर आपपल्या कुुटंबात विसावला होता. ग्रामीण भागातही लोकांनी व्यवहार बंद ठेवून घरीच राहणे पसंद केले. कागल, मुरगूड, मलकापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर आदी नगरपालिकांच्या शहरातही लोकांनी लॉकडाऊनला प्रतिसाद दिला.प्रत्यक्षात या लॉकडाऊनची सुरुवात शुक्रवारी रात्रीच झाली असली तरी कोल्हापूरकरांचा शनिवारची सकाळ आळसावलेली होती. उठून काय करायचे आहे म्हणून बराच वेळ लोक अंथरुणातच पडून राहिले. शनिवारी सकाळी मात्र लागू झालेला लॉकडाऊन पुढे ३० एप्रिलपर्यंत कायम होणार की काय या भितीनेच अनेकांची गाळण उडाली. पोहे खात लोकांनी वृत्तवाहिन्यांवरील बातम्यात त्याचे कांही उत्तर मिळते का याचा शोध घेतला.
लोकमतच्या प्रतिनिधीने सकाळी साऱ्या शहरभर फेरफटका मारला. रस्त्यावर अत्यंत तुरळक वर्दळ दिसत होती. ज्यांच्या घरातील अचानक गॅस संपला होता ते टाकीला चादर गुंडाळून मोटारसायकलवरून नवीन सिलींडर आणायला निघाले होते. ग्रामीण भागातून दूध घेवून आलेले गवळी घरोघरी दूधाचे वाटप करत होते. महापालिकेचे आरोग्य कर्मचारी त्यांच्या दैनंदिन कामात व्यस्त होते.
ओला कचरा..सुका कचराची धून सगळीकडे वाजत होती. तुंबलेली गटर्स काढण्याचे कामही सुरु होते. महाद्वार, लक्ष्मीपुरीत एटीएम सेंटरच्या दारात बसलेले सुरक्षा रक्षक वगळता रस्त्यावर चिटपाखरू नव्हते. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठेत सकाळच्या टप्प्यात गाडी धुणे, घरातील स्वच्छतेची कामे सुरु होती. रस्त्यावर मुले क्रिकेट खेळत होती.औषधाची दुकाने सुरु होती परंतू फारसे ग्राहक नव्हते. रक्त तपासणी प्रयोगशाळा व तुरळक कुठेतरी दवाखाना सुरु होता. दूधविक्री केंद्रे मात्र सुरु होती. कपिलतीर्थ भाजी मार्केट झाकलेल्या भाजीपाल्याचे ढिग घेवून विश्रांती घेत होते. शिंगोशी मार्केटमधील फुलांचा वास संपला होता. अंबाबाईच्या मंदिरात बाहेरूनच हात जोडणारा भाविकही दिसत नव्हता.केएमटी-एसटीची चाके थांबली..लॉकडाऊनमुळे केएमटी व एसटीची चाके पुन्हा थांबली. त्यामुळे रंकाळा, मध्यवर्ती बसस्थानक रिकामे होते. गाड्याची रांग लावून ठेवली होती. एखादी तुरळक केएमटी रस्त्यावर धावताना दिसली. रिक्षाही एखाद्या रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी रस्त्यावर आलेली दिसली.असा होता दिनक्रम..लोकांनी घरी बसून लोकमत वाचून कोल्हापूर शहर, राज्यासह देशातील कोरोना स्थिती जाणून घेतली. कांही जणांनी जाणीवपूर्वक आवडीचे वाचन केले. कांहीनी व्हॅटसअपवरील मेसेज वाचण्यात व ते दुसऱ्याला पाठविण्यात आनंद शोधला. पैपाहुण्यांशी, मित्रांशी फोनवरून ख्याली खुशालीही विचारली गेली. दिवसभर टीव्हीवरील मनोरंजनाचे कार्यक्रम पाहणे, चमचमीत खाणे, विश्रांती आणि रात्र आयपीएलची मॅच पाहण्यात घालवली.दहावी-बारावीचे काय..ज्या कुटुंबात दहावी-बारावीची मुले आहेत त्या पालकांची चिंता तर वेगळीच होती. या परिक्षा होणार की लांबणार याबध्दल कांहीच माहिती मिळत नाही. परिक्षा लांबणीवर जातील म्हणून मुलांनाही अभ्यासातून अंग काढून घेतल्याने पालक हवालदिल झाले आहेत.