कोल्हापूर : गेल्या महिन्याभरात कोरोना प्रतिबंधक लस पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विस्कळीतपणा आला आहे. याच गतीने जर लस पुरवठा होणार असेल तर निश्चितच संपूर्ण पात्र नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी २०२२ साल उजाडणार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयाने लस पुरवठा वाढवण्याची गरज आहे. एका बाजूला रोज रुग्णसंख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. त्यापासून बचाव करणारी म्हणून नागरिक लसीकरणासाठी रांगा लावत आहेत; परंतु दोन-दोन तास रांगेत थांबूनही लस मिळत नसल्याचे चित्र आहे. सुरुवातीच्या टप्प्यात भीतीमुळे कोण लसीकरणासाठी गेले नाही व आता लस मिळत नाही आणि लोकांची मात्र तोबा गर्दी उसळत आहे.
जिल्ह्यामध्ये १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. सुरुवातीला आरोग्य विभागातील डॉक्टर्स आणि कर्मचारी, त्यानंतरच्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर, नंतर पंचायत राज व्यवस्थेतील अधिकारी, कर्मचारी यांना लसीकरण सुरू करण्यात आले. या पहिल्या तीन गटातील लसीकरण जोपर्यंत सुरू होते, तोपर्यंत लस पुरवठाही नीटपणे सुरू होता. आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पहिल्या डोसचे १०० टक्के, तर दुसऱ्या डोसचे ५४ टक्के लसीकरण झाले आहे. फ्रंटलाईन वर्कर यांचे पहिल्या डोसचे १७६ टक्के, तर दुसऱ्या डोसचे ६६ टक्के लसीकरण झाले आहे.
यानंतर २५ ते ६० वर्षांमधील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आणि त्यानंतर लस पुरवठाही विस्कळीत झाला. कोल्हापूर जिल्ह्याने उत्तम नियोजन केल्यामुळे दहा दिवसांपूर्वी सर्वाधिक म्हणजे ५१ हजार जणांना एका दिवसात लसीकरण करण्यात आले. १५ ते ४५ आणि ६० वर्षांवरील ५० टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. मात्र, केवळ ७ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. यानंतर केंद्र सरकारने १८ ते ४४ वर्षांच्या दरम्यानच्या युवक व नागरिकांना लस देण्याची घोषणा केली. मात्र, आधीच्याच नागरिकांना दुसरा डोस मिळताना मारामारी सुरू झाल्याने या वयोगटातील सध्याचे लसीकरण प्रायोगिक तत्त्वावरच सुरू आहे.
चौकट
आठवड्याला हवेत २ लाख डोस
जिल्ह्यात गेल्या महिन्यात काही दिवस सरासरी ३५ हजार नागरिकांना दिवसाला डोस दिले जात होते. मात्र, नंतर डोसचा पुरवठा कमी आला आणि हे प्रमाण घसरले. या आठवड्यात सलग तीन दिवस लसच न आल्याने केंद्रे बंद ठेवावी लागली.
कोल्हापूर जिल्ह्याचे लसीकरण दृष्टिक्षेपात...
एकूण लोकसंख्या : सुमारे ३८ लाख
लसीकरणास पात्र लोकसंख्या : ३४ लाख ४३ हजार ८१७
पहिला डोस : ८ लाख ६० हजार ९५४ : २५ टक्के
दुसरा डोस : १ लाख ३७ हजार ७५२ : फक्त ४ टक्के
वयोगट, विभाग लाभार्थी पहिला डोस टक्के दुसरा डोस टक्के
आरोग्य अधिकारी, कर्मचारी : ३८ हजार २५६ : १०६ टक्के ५४ टक्के
फ्रंटलाईन वर्कर, पंचायत : २९ हजार ८२१ : १७६ टक्के ६६ टक्के
१८ ते ४५ वयोगट : १८ लाख ५२ हजार ३६८ : .०३ ०० टक्के : ००
४५ वर्षांच्या पुढील : १५ लाख २३ हजार ३७२ : ५० टक्के ०७ टक्के
जिल्हा एकूण : ३४ लाख ४३ हजार ८१७ २५ टक्के ०४ टक्के
(जिल्हा प्रशासनाकडे पहिला डोस किती पुरुष व महिलांनी घेतला व दुसरा डोस किती पुरुष व महिलांनी घेतला याची अपडेट माहिती उपलब्ध नाही.)
चौकट
लसीकरणामध्ये सुुसूत्रता आवश्यक
इतकी आधुनिक यंत्रणा हाताशी असताना नागरिकांची लसीकरणासाठीची ससेहोलपट थांबवण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारला यश आलेले नाही. लसीचा अपुरा पुरवठा, कोणत्या केेंद्रावर कधी लस मिळणार याचा गोंधळ यामुळे नागरिक हैराण झाल्याचे चित्र सर्रास पहावयास मिळत आहे. गर्दी करू नका यासाठी प्रशासन काठ्या घेऊन उभे असताना लसीकरणासाठीच्या गर्दीमुळेच कोरोना वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.