कोल्हापूर : जुलै महिना तसा धो धो पाऊस कोसळणारा; पण गेल्या दोन वर्षांपासून या महिन्यातील पहिला पंधवडा कोरडाच जात आहे. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती झाली असून मोठ्या पावसासाठी आभाळाकडे डोळे लागले आहेत. त्यानंतर मात्र अगदी महापूर येईपर्यंत पाऊस कोसळण्याचा मागील दोन वर्षांचा अनुभव पाहता सर्वांच्या मनात आतापासून भीती दाटू लागली आहे.जिल्ह्यात २०१९ ते २०२१ या तीन वर्षांतील जून-जुलैमधील पावसाचा अंदाज घेतला तर या तीनही वर्षी मॉन्सूनने वेळेत आगमन केल्याचे दिसते. २०१९ मध्ये तर पावसाने जूनमध्येच सुरू केलेला रपाटा ऑगस्टअखेरपर्यंत सुरूच राहिला होता. या तुलनेत गेल्या वर्षी २०२० मध्ये जूनमध्ये पावसाने आगमन केले, पण त्यानंतर जी दडी मारली ती २५ जुलैपर्यंत पावसाने प्रतीक्षा करायला लावली.
आता चालू वर्षीदेखील मॉन्सूनने जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच जोरदार बॅटिंग केली, त्यानंतर तो पाऊस गायब झाला आहे, तो अद्याप परतलेलाच नाही. अधेमधे एखादं दुसऱ्या किरकोळ सरी येतात, पण त्यात जोर नसल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा पिकांना लागली आहे.पहिल्या पंधरवड्यात गेल्या दोन वर्षांत सरासरी केवळ ५० ते १०० मिलिमीटर असा किरकोळ पाऊस पडला आहे. त्यानंतर मात्र दुसऱ्या पंधरवड्यात सरासरीच्या दुप्पटीने पाऊस पडल्याचे दोन वर्षांचे आकडे सांगतात. गेल्या वर्षी २५ जुलैनंतर परतलेल्या पावसाने महिनाअखेरपर्यंत तब्बल ७७२ मिलिमीटर इतक्या तुफानी पावसाची नोंद झाली.
हा पाऊस पुढे वाढतच गेल्याने २०१९ प्रमाणे ऑगस्टच्या पहिल्या आठड्यात महापूर आला. २०१९ मध्ये देखील असाच २० जुलैनंतर पाऊस सुरू झाला होता आणि अवघ्या दहा-बारा दिवसांच्या पावसात जिल्ह्यात महापूर आला होता. या वर्षीदेखील तशीच चिन्हे दिसत आहेत. कारण आता तरणा पाऊस असाच तुरळक जाणार असून, २० नंतर सुरू होणाऱ्या म्हाताऱ्या नक्षत्रापासून खऱ्या अर्थाने पावसाला जोर चढणार आहे.जुलैच्या पहिल्या पंधवड्यापर्यंत पडलेला पाऊसवर्ष पाऊस (मिलिमीटरमध्ये)
- २०१९ ४३७
- २०२० २००
- २०२१ ४०६ (आतापर्यंत)
पीक-पाणी उत्तम; पण भीती महापुराची२०१९ मध्ये सातत्याने पाऊस पडल्याने पेरण्यांही अडकल्या होत्या. ३० टक्क्यांहून अधिक क्षेत्रातील पेरण्याच झाल्या नाहीत. ज्या झाल्या त्या महापुराच्या तडाख्यात कुजून गेल्या. यावर्षी आतापर्यंत ८० टक्केपर्यंत पेरण्या झाल्या असून पिकेही तरारली आहेत. फक्त आठ दिवसांपासून पाऊस नसल्याने त्याची वाढ खुंटली आहे. आता एकसारखा पाऊस सुरू झाला तर मात्र २०१९ सारखी पूरस्थिती निर्माण होऊन पीक धोक्यात येणार आहे.आता १५ पासून पाऊस जोर धरणारपावसाने दीर्घकाळ दडी मारली असलीतरी उद्यापासून वादळाच्या स्वरूपात पाऊस पुनरागमन करेल आणि या महिनाअखेरपर्यंत मुक्काम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे आता कोरडे वाटणारे शेतशिवार या महिनाअखेर पाण्याने तुडुंब होणार आहे.
हा पाऊस ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सलग बरसणार आहे. त्यानंतर पुढे दहा-बारा दिवसांची विश्रांती घेऊन पुन्हा १५ सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याचा असल्याने त्याअनुषंगाने शेतीकामाचे नियोजन करण्याची गरज आहे.दिवसभर पावसाची हुलकावणीगुरुवारी किरकोळ स्वरूपात पाऊस पडेल असा अंदाज होता; पण दिवसभर ढगाळ वातावरण राहिले तरी पावसाने हुलकावणी दिली. दरम्यान, रात्री ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याचा असल्याने आज शुक्रवारी तहानलेल्या पिकांना थोडाफार दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.