लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : पहिल्यांदा इयत्ता नववी ते बारावी आणि त्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. शासन नियमांचे पालन करत शाळा भरल्या आहेत. त्यामुळे इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांना देखील शाळेत जाण्याचे वेध लागले आहेत. शाळेत जाण्यासाठी ते पालकांकडे हट्ट करीत आहेत. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती असल्याने पालक त्यांना नकार देत आहेत.
कोरोनामुळे गेल्या मार्चपासून शाळा बंद झाल्या. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नोव्हेंबरमध्ये नववी ते बारावी, तर जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात पाचवी ते आठवी आणि गेल्या दोन आठवड्यापूर्वी महाविद्यालयांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग ऑफलाईन पध्दतीने भरले. जूनपासून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि व्हिडीओच्या माध्यमातून शिक्षण सुरू आहे. अकरा महिन्यांपासून या पध्दतीने शिक्षण सुरू असल्याने संबंधित विद्यार्थी कंटाळले आहेत. शाळेत जाण्यासाठी ते पालकांकडे हट्ट करीत आहेत. या विद्यार्थ्यांना शाळा हवी आहे. कोरोनामुळे पालक त्यांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत.
चौकट
जूनमध्ये वर्ग भरण्याची शक्यता
इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग सध्या भरत असले, तरी त्यांच्या उपस्थितीचे प्रमाण ५० टक्के आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची स्थिती पाहता, इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा ऑनलाईन सुरू ठेवण्याचा निर्णय शाळांनी घेतला आहे. या इयत्तांचे वर्ग जूनपासूनच भरण्याची शक्यता आहे.
मुलांना हवी शाळा
घरातच अभ्यास करून आणि खेळून कंटाळा आला आहे. इतरांप्रमाणे मलाही शाळेत जायचे आहे.
- प्राची गिरी, पहिली, उजळाईवाडी.
मलाही शाळेत जायचे आहे. माझ्या मित्रांना भेटायचे आहे. ते आई-बाबांना मी सांगितले आहे.
- राजवीर द्राक्षे, दुसरी, शिवाजी पार्क
पाचवी, सहावीचे दादा, दीदी शाळेत जात आहेत. त्यांना पाहून मलाही शाळेत जावेसे वाटत आहे. पण, कोरोनाचीही भीती वाटत आहे.
- अक्षरा जाधव, तिसरी, पाचगाव.
वर्गात शिक्षण ज्या पध्दतीने समजावून शिकवितात, त्याप्रमाणे ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे शाळा सुरू व्हावी असे मला वाटते.
- विरेन जाधव, चौथी, शाहू मिल कॉलनी.
पालकांना चिंता?
कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. त्यामुळे मुलांना शाळेत पाठविण्याची भीती वाटत आहे.
- धनश्री निकम, शाहूपुरी.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन लहान मुलांना करता येणार नाही. त्यामुळे पहिली ते चौथीचे वर्ग सध्या सुरू करू नयेत.
- सागर पंतोजी, उजळाईवाडी.
कोरोनाची सध्याची स्थिती पाहता, पुन्हा या लहान मुलांच्या जिवाशी खेळण्यात अर्थ नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाल्यानंतर वर्ग भरवावेत.
- संज्योत जिरगे, आर. के. नगर.
पाचवी, आठवीनंतर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू व्हावी असे वाटत होते. मात्र, कोरोना पुन्हा वाढत असल्याने थोडा वेळा थांबावे, असे पालक म्हणून वाटते.
- अनुराधा वातकर, उचगाव
आकडेवारी दृष्टिक्षेपात...
पहिली ते चौथीच्या एकूण शाळा : १९७७
एकूण विद्यार्थी संख्या : ११४४०९
मुलांची संख्या : ५७८६३
मुलींची संख्या : ५६५४६