राजाराम लोंढे,
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या प्रचारातील मुख्य मुद्दा टँकरचे वाहतूक भाडे ठरल्याने सत्तांतरानंतर पहिला हातोडा टँकरवर पडणार आहे. सध्या दूध वाहतुकीसाठी १५० टँकर असून या टँकरचा दूध वाहतूक करार चार-पाच महिन्यांत संपत आहे. त्यानंतर यातील किमान १३० टँकर बंद होणार, हे निश्चित आहे. संचालकांच्या मर्जीतील व गेली अनेक वर्षे एकाच ठिकाणी तळ ठोकून बसलेल्या व संघाच्या कामापेक्षा राजकारणात रस असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जात आहे. या कर्मचाऱ्यांसह कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्यासह पुणे व मुंबई येथील वरिष्ठ अधिकारी हिट लिस्टवर आहेत.
राजकीय पदासाठी नेहमीच चढाओढ असते. मात्र ‘गोकुळ’ची सत्ता व संचालक पदाची गोडी काही औरच आहे. त्याला टँकर, स्थानिक दूध वाहतुकीचे टेंपो, दूध वितरणाची एजन्सी आदी बाबी कारणीभूत आहेत. गेली पाच वर्षे विरोधी आघाडीचे नेते हे मुद्दे घेऊनच सभासदांच्या दारात गेले. दूध संघातील केवळ टँकरचे टेंडर बदलले, तर लिटरला एक रुपया जादा दर देणे सहज शक्य होईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जाहीर केले आहे. सत्तांतरानंतर अंतर्गत हालचाली पाहता, नेते व संचालकांच्या टँकरवर पहिला हातोडा टाकला जाणार आहे. संघात नेत्यांसह संचालक व त्यांच्या नातेवाईकांचे १५० टँकर आहेत. आता सत्तेत आलेल्या आघाडीतील तीन संचालकांचे सुमारे २० टँकर आहेत. दूध वाहतुकीचा टँकर मालकाशी पाच वर्षांचा करार आहे. त्याची मुदत २०२१ मध्ये संपत आहे. त्यामुळे येत्या चार-पाच महिन्यात हे टँकरचे ठेके बदलले जाणार, हे निश्चित आहे.
टँकरशिवाय संघातील अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीवर नवीन संचालकांचा राग आहे. सर्वसाधारण सभेला कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांना हटवा, सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचे काम काय? अशी विचारणा विरोधी गटाने केली होती. डी. व्ही. घाणेकर यांच्यासह पुणे व मुंबईतील वरिष्ठ अधिकारी हिट लिस्टवर आहेत. घाणेकर सेवानिवृत्त होऊन दोन वर्षे झाली. त्यात सत्तांतर झाल्याने ते स्वत:हून पदावरून बाजूला होण्याची शक्यता आहे. संचालकांच्या मागे-पुढे करणाऱ्या व गेली अनेक वर्षे एकाच ठिकाणी तळ ठोकलेल्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. ‘गोकुळ’च्या कामापेक्षा राजकारणात रस असलेले काही कर्मचारीही आहेत. ‘गोकुळ’सह जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभेच्या निवडणुकीत थेट प्रचारातही काही पुढारी कर्मचारी सक्रिय होते. हेही कर्मचारी हिट लिस्टवर आहेत.
फार्म हाऊस, घरातील कर्मचारी ‘गोकुळा’त येणार
‘गोकुळ’मध्ये अनेक वर्षे सत्तेत असलेल्या संचालकांनी संघाच्या प्रत्येक गोष्टीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केला. काही संचालकांचे फार्म हाऊस व घरात ‘गोकुळ’चे कर्मचारी काम करतात. काम संचालकाचे आणि पगार दूध संघाचा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ‘गोकुळा’त यावे लागणार आहे.