कोल्हापूर : आतापर्यंत शासनाने फसवलेच आहे. आता उठा म्हणतील, पैसे जमा करतो म्हणतील; पण गेल्यावर पुन्हा शांत बसतील. आतापर्यंतचा सरकारी यंत्रणेचा वाईट अनुभव आहे. आम्ही आता फसणार नाही. सात गावांतील एक हजार खातेदारांच्या खात्यावर संपूर्ण रक्कम जमा झाल्याशिवाय उठायचे नाही, असा निर्धार श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत चांदोली अभयारण्यग्रस्तांनी बुधवारी केला. वन विभागाने ३० लाखांची रक्कम ५७ खातेदारांच्या खात्यावर वर्ग केली. उर्वरित रक्कम येत्या चार दिवसांत वर्ग करू, असे सांगितले, तरीही ठिय्या आंदोलनावर आंदोलक ठाम राहिले.
चांदोली अभयारण्यग्रस्तांनी शासनाने थकीत देणी देण्याच्या मागणीसाठी मंगळवार (दि. २७) पासून रमणमळ्यातील वन विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी दुपारी भारत पाटणकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. आंदोलन थांबवू नका, असे त्यांनी आवाहन केले. दरम्यान, बुधवारी सकाळीच सहायक वनसंरक्षक एस. एम. मुल्ला यांनी आंदोलकांची भेट घेऊन रक्कम वर्ग करू; फक्त बॅँकिंग व्यवस्थेवर ताण येत आहे. तरीदेखील सर्वांच्याच खात्यावर ती लवकरच जमा होईल, असे सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली; पण आंदोलकांनी ती फेटाळून लावली. या संदर्भात बोलताना श्रमिक मुक्ती दलाचे मारुती पाटील यांनीही अभयारण्यग्रस्त असलेल्या सात गावांना ही रक्कम तातडीने मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे ठरविले असल्याचे सांगितले.सात गावांतील संसार वनविभागाच्या दाराततानाळी, सोनार्ली, निवळे, चांदेल, टाकाळे, पुलाची वाडी ही कोल्हापूर जिल्ह्यातील सहा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गोठणे हे एक गाव अशा एकूण सात गावांतील अभयारण्यग्रस्त आपल्या बायाबापड्यांसह वनविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास बसले आहेत. घरदार सोडून लहान मुले, वृद्धांसह त्यांनी आपला संसारच रस्त्याकडेला वसविला आहे.चार दिवसांत रक्कम खात्यावर वर्ग होईल :एस. एम. मुल्ला, सहायक वनसंरक्षक, वन विभाग, कोल्हापूरअभयारण्यग्रस्तांच्या खात्यांवर ४ कोटी २२ लाखांची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. ती टप्प्याटप्प्याने येत्या चार दिवसांत वर्ग होईल. त्यांपैकी पहिला ३० लाखांचा हप्ता बुधवारी बँकेकडे पाठविण्यात आला. आज, गुरुवारी आणखी ५० लाख पाठविले जाणार आहेत. मोठी रक्कम असल्याने युनियन बँकेकडून यासाठी थोडा वेळ मागण्यात आला आहे. तरीदेखील ती लवकरात लवकर जाईल, अशी व्यवस्था केली आहे.आमच्या भाळी संघर्षाचंच जिणं... जवळपास ७५ किलोमीटरचे अंतर पार करून चांदोली अभयारण्यातील बायाबापड्यांनी कोल्हापुरातील रमणमळ्यातील वन विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. व्यवस्थेकडून वर्षानुवर्षांचे नाकारलेपण आणि कपाळावर संघर्षाचे निशाण घेऊन जगत असलेल्या या वृद्ध महिलांच्या आयुष्याच्या उतरणीलाही संघर्षच वाट्याला आला आहे.--फोटो नसीर अत्तार