सांगली : मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात सुरू असलेल्या मोडी लिपी अभ्यासक्रमास विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) ने मान्यता दिली आहे. युजीसीची मान्यता असलेला हा देशातील पहिलाच मोडी अभ्यासक्रम असून, येत्या आॅगस्ट महिन्यापासून त्यास प्रारंभ होत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. कुलकर्णी यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.कुलकर्णी म्हणाले की, मोडी लिपी सातशे वर्षांपासून व्यवहारात आहे. मराठेशाहीत या लिपीला राजलिपीचा दर्जा मिळाला. १९५२ नंतर मात्र मोडी लिपी शिक्षणक्रमातून काढून टाकण्यात आली. त्यामुळे आज मोडी लिपी फारशी कोणाला माहीत नाही. मोडी लिपीतील लाखो कागदपत्रे देशभर विविध ठिकाणी उपलब्ध आहेत. ही कागदपत्रे वाचून त्यामध्ये दडलेल्या इतिहासावर प्रकाश टाकण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे पन्नास वर्षांपूर्वीची महसुली कागदपत्रे, जन्म-मृत्यूच्या नोंदी, न्यायालयीन कागदपत्रे मोडी लिपीतच आहेत. महाविद्यालयाच्या माध्यमातून मागील तीन वर्षापासून मोडी लिपीबाबत प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येत आहेत. विद्यार्थिनींना शिक्षण घेऊन अर्थार्जन करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनी यासाठी प्रवेश घेऊ शकतात, अशी माहितीही कुलकर्णी यांनी दिली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा मेधा भागवत, प्रा. उर्मिला क्षीरसागर, मानसिंग कुमठेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
देशातील पहिला मोडी अभ्यासक्रम सांगलीत
By admin | Published: July 22, 2014 11:04 PM