कोल्हापूर , दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू झाली असून जिल्ह्यात किती शेतकऱ्याना त्याचा लाभ मिळणार हा आकडा सोमवारी स्पष्ट होणार आहे. त्याचबरोबर सोमवार (दि.२३) ते बुधवार (२५)पर्यंत उर्वरित ६५० गावांत चावडी वाचनाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
बुधवारी दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफी झालेल्या काही शेतकऱ्याना कर्जमाफीची प्रमाणपत्रे देऊन कर्जमुक्तीच्या अंमलबजावणीला सुरुवात केली. कोल्हापुरातही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते निवडक शेतकऱ्याना ही प्रमाणपत्रे देण्यात आली.
या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ८ लाख ४० हजार शेतकºयांना चार हजार कोटी रुपयांची कर्जमाफीसाठी तरतूद करून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केली.
कोल्हापूर जिल्ह्यात किती लोकांना पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीचा लाभ होणार हे सोमवारी (दि. २३) स्पष्ट होणार आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना अद्याप शासनाकडून आलेल्या नाहीत. त्या सोमवारपर्यंत येणार असून त्यानंतरच जिल्ह्यातील आकडा कळणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत २,७०,५९० अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हा मध्यवर्र्ती बँकांमधील ५३,२६२ थकबाकीदार असून २२३ कोटी १७ लाख रुपये थकबाकीची रक्कम आहे तर राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण बँकांमधील ५४,७२९ थकबाकीदार असून थकबाकीची रक्कम ६५ कोटी १३ लाख आहे.
जिल्ह्यातील एकूण पात्र १८४८ सेवा संस्थांमधील २,५२,९७० सभासदांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. शासननिर्णयानुसार २००९ पूर्वीचे व ३१ मार्च २०१६ नंतरचे थकबाकीदार या कर्जमाफीत येणार नाहीत. यामध्ये २०१५-१६ व २०१६-१७ मधील नियमित परतफेड करणाऱ्याना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर आतापर्यंत ३९१ ग्रामपंचायतींचे चावडी वाचन पूर्ण झाले असून उर्वरीत ६५० ग्रामपंचायतींचे चावडी वाचन सोमवार (दि.२३) ते बुधवार (दि.२५)पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.