कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतील प्रशासकीय कामासाठी भारत निवडणूक आयोगाकडून २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून तो जिल्हा निवडणूक विभागाकडे देण्यात आला आहे. यातील पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांकरिता प्रत्येकी ७५ लाख रुपये याप्रमाणे साडेसात कोटी रुपये वितरित करण्यात आले असून, ही रक्कम खर्चही झाली आहे. त्याचा हिशेब घेण्याची प्रक्रिया निवडणूक विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.लोकसभा निवडणूक म्हटले की, मोठ्या प्रमाणावर यंत्रणा लागते. त्यासाठी खर्चही त्याच पद्धतीने होतो. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीत जिल्ह्याकरिता २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून तो प्रत्येक विधानसभेसाठी दोन कोटी याप्रमाणे देण्यात आला आहे. यातील पहिल्या टप्प्यात कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कागल, चंदगड, पन्हाळा, राधानगरी, हातकणंगले, शिरोळ, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी ७५ लाख रुपये देण्यात आले आहेत. ही रक्कम बहुतांश ठिकाणी पूर्ण क्षमतेने खर्च झाली आहे, तर काही ठिकाणी काही प्रमाणात खर्च व्हायची आहे.मतमोजणीच्या ठिकाणी मंडप, कर्मचाऱ्यांच्या जेवणासाठी कॅटरिंगची सुविधा, मतदानासाठी घेण्यात आलेल्या एस. टी. बसेसचे भाडे, कर्मचाऱ्यांचे भत्ते, त्या शिवाय स्टेशनरी, आदींसाठी पैशांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात दिलेली रक्कम पाहता त्यामध्ये वरील खर्च बसण्याची शक्यता कमी आहे.
त्यामुळे आणखीही पैसे लागणार असून त्यामुळे मागणीनुसार उर्वरित पैसे निवडणूक विभागाकडून संबंधित विधानसभा मतदारसंघांसाठी दिले जाणार आहेत. सध्या पहिल्या टप्प्यात खर्च झालेल्या रकमेचा हिशेब संबंधितांकडून घेण्याची प्रक्रिया जिल्हा निवडणूक विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.