कोल्हापूर : विमानतळाच्या धावपट्टीच्या कामाचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या वाटेवर आहे. नाईट लँडिंगसाठी आवश्यक सुविधांच्या उभारणीचे काम सुरू आहे. खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी विमानतळ येथे सुरू असलेल्या विविध कामांची माहिती घेतली. विस्तारीकरण, कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवा सुरू होण्यातील अडचणी दूर करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे यावेळी त्यांनी सांगितले.कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरण, विकासाअंतर्गत त्या ठिकाणी विविध कामे सध्या सुरू आहेत. त्यांची माहिती, त्याबाबत असलेल्या अडचणी समजून घेण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी विमानतळाला भेट दिली. धावपट्टीचे सुरू असलेले काम, नाईट लँडिंगसाठी आवश्यक सुविधांची पूर्तता, विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या ६४ एकर अतिरिक्त जागेच्या हस्तांतरणाची स्थिती याबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती प्राधिकरणाचे उपसंचालक आनंद शेखर यांनी दिली. यावेळी योगेश केदार, राहुल शिंदे उपस्थित होते. खासदार संभाजीराजे म्हणाले, मध्यम आकाराची आणि मोठी विमाने उतरण्यासाठी धावपट्टी वाढविण्यात येत आहे. या कामाचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या वाटेवर आहे. विस्तारित धावपट्टीच्या मार्गामध्ये एक मंदिर येत आहे. ते स्थलांतरित करावे लागणार आहे.
नाईट लँडिंगसाठी धावपट्टीच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी १४० मीटर जागेचे सपाटीकरण केले जात आहे. आॅब्स्टॅकल लाइट लावण्यात येणार आहेत. कोल्हापूर-मुंबई सेवेसाठी प्रयत्न सुरू आहेत. विस्तारीकरणाअंतर्गत विमानतळाच्या मुख्य इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. या इमारतीची दर्शनी बाजू आणि बाह्य स्वरूप हे कोल्हापूरच्या ऐतिहासिक परंपरेला, संस्कृतीला साजेसे असावे, अशी सूचना विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी, अभियंता यांना दिल्लीतील बैठकीत दिली आहे.