कुंभोज : वीस हजार लोकवस्तीच्या कुंभोज (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत, तसेच कोरोना नियंत्रण समितीच्या वतीने सुरुवातीपासून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनात्मक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात आल्यामुळे गावातील रुग्णांची संख्या पन्नाशीच्या आत नियंत्रित राहिली आहे. लसीकरणाची सद्य:स्थिती, याबाबतच्या अडचणी समजावून घेत कोरोना नियंत्रणासाठी जनजागृतीसाठी सरपंच, उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी ‘ग्रामपंचायत पदाधिकारी आपल्या दारी’ ही मोहीम हाती घेतली आहे. केवळ मते आणि घरफाळा पाणीपट्टी वसुलीसाठी पदाधिकारी आपल्या दारात येत नसून कोरोना काळात घरी राहा.. काळजी घ्या..अशा आपुलकीने दारात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांबद्दल ग्रामस्थांमधून कृतज्ञता व्यक्त होत आहे.
सरपंच माधुरी घोदे, उपसरपंच दाविद घाटगे, ग्रा.पं सदस्य, ग्रामविकास अधिकारी ए.एस. कठारे, तसेच कोरोना नियंत्रण समितीच्या वतीने गावात कोरोनाला अटकाव करण्यासाठी स्थानिक, तसेच जिल्हा प्रशासनाकडून येणाऱ्या प्रत्येक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आल्यामुळे गावात सद्य:स्थितीत ४६ बाधित रुग्ण असून त्यापैकी २७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. पहिल्या लाटेत हा आकडा शंभरावर गेला होता. कोरोनाने तीन जणांचा मृत्यू झाल्याने सरपंचांसह सर्वच पदाधिकारी आपापल्या प्रभागात घरोघरी जाऊन नागरिकांनी लस घेतली की नाही याबाबत माहिती घेत आहेत. ‘घरी राहा.. सुरक्षित राहा..लस घ्या,’ अशी विनंती करीत घरी कोणी आजारी आहे का, अशी विचारपूस करीत आहेत. पदाधिकाऱ्यांच्या आपलेपणाबद्दल ग्रामस्थांतून समाधानाबरोबरच कृतज्ञताही व्यक्त होत आहे.
१५ कुंभोज ग्रामपंचायत
फोटो ओळी-
कुंभोज, ता.हातकणंगले येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ग्रामपंचायत पदाधिकारी आपल्या दारी’ मोहिमेंतर्गत गृहभेट घेताना सरपंच माधुरी घोदे, ग्रा.पं सदस्य अजित देवमोरे.