कोल्हापूर : गुन्हा घडल्यानंतर अगर अन्याय झाल्यानंतर, त्याची तक्रार संबंधित हद्दीतील पोलीस ठाण्यात दिली जाते. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तक्रार दाखल करून घेताना पोलीस ठाण्याच्या हद्दीचा वाद उफाळतो व तक्रार नोंदवून घेण्यास टोलवाटोलवी होते, त्याचा फटका तक्रारदारास बसतो. गेल्या पाच वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात हद्दीवरून तक्रार दाखल करून घेण्यास पोलीस ठाण्यातील अंमलदारांकडून टाळाटाळ केल्याच्या घटना दुरापस्त आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्याची हद्द ठरलेली आहे, घटनेची रितसर नोंद त्या-त्या हद्दीतील पोलीस ठाण्यात होते. पूर्वी अन्यायधारक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला तर त्याला ही घटना आमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत नाही, असे सांगून दुसऱ्र्या पोलीस ठाण्याकडे बोट दाखवून हात झाडले जात होते. पण आता सीआरपीसी १५४ प्रमाणे तक्रारदार ज्या पोलीस ठाण्यात गेला, तिथेच गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. नंतर तो ती तक्रार संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग करणे अपेक्षित आहे.
जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अभिनव देशमुख यांच्यासह विद्यमान शैलेश बलकवडे यांनी, तक्रारदाराने कोणत्याही पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी असे आवाहन केले. नोंद झाल्यानंतर त्या पोलीस ठाण्याने नंतर ती हद्दीतील संबंधित पोलीस ठाण्याकडे झीरो नंबरने वर्ग करावी, अशा सक्त सूचना दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात तक्रार नोंदवताना पोलीस ठाण्याच्या हद्दीचा वाद दिसून आलेला नाही.
जिल्ह्यात एकूण पोलीस ठाणे : ३१
पोलीस अधिकारी : २५८
पोलीस कर्मचारी २८६५
तक्रार दाखल करून न घेतल्यास कारवाई
- एखाद्याची तक्रार संबंधित ठाणे अंमलदाराने नोंदवून न घेतल्यास तक्रारदाराने तेथील प्रभारी अधिकाऱ्र्याकडे तक्रार करावी. त्यांनीही तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केल्यास दोघांवरही वरिष्ठांमार्फत चौकशी करून दंडात्मक कारवाई होते.
- घटना किरकोळ असेल तर अदखल पत्र गुन्हा नोंदवून घेणे संबंधित पोलीस ठाण्यात बंधनकारक नसते.
- कौटुंबिक वाद, भाऊबंदकी वाद तसेच डॉक्टरसह इतर व्यावसायिकांविरोधात तातडीने तक्रार नोंदवली जात नाही, त्यासाठी संबंधित प्रभारी अधिकार्यास १ ते ६ आठवडेपर्यत मुभा असते. अशा प्रकरणात चौकशी करूनच गुन्हे नोंदवतात.
नदीतील पाणी व किनारची हद्द
नदीत अगर नाल्यात एखादी घटना घडल्यास ती पाण्यात घडली की पाण्याबाहेर घडली. यावरून पोलीस ठाण्याच्या हद्दतील वाद उफाळतो. अनेकवेळा मृतदेह नदीकाठी आढळतो. मृतदेहाचा काही भाग पाण्यात काही काठावर असतो, त्यावेळी हा वाद दिसतो. त्यावेळी संबंधित हद्दीतील पोलीस उपअधीक्षक सूचना देतील त्या हद्दीतील पोलीस ठाण्यात दाखल करून घेतले जाते.
कोणत्याही पोलीस ठाण्यात अन्यायधारकाची तक्रार नोंदवून घ्यावी. हद्दीत घटना येत नाही म्हणून तक्रार टोलवल्यास संबंधित पोलिसांवर कारवाई करू. तक्रारदार ऑनलाईनही तक्रार नोंदवू शकतो. - शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर.