लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाराष्ट्रामध्ये सामाजिक सुधारणा घडविण्यामध्ये मोठी कामगिरी केलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावे राज्यभरातील पहिले संशोधन केंद्र कोल्हापुरात स्थापन झाले होते. मात्र सध्या बंद असलेल्या या केंद्राच्या कामाची पुन्हा सुरुवात करण्यात येणार आहे. तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीमध्ये येथील शहाजी महाविद्यालयात हे केंद्र स्थापन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आबासाहेब शिंदे यांच्या संकल्पनेतून हे संंशोधन केंद्र सुरू करण्यात आले होते. या शिक्षण संस्थेचे प्रमुख श्रीपतराव बोंद्रे हे चव्हाण यांच्या निकटचे होते; त्यामुळे त्यांच्याच विनंतीनुसार यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक या कार्यक्रमासाठी कोल्हापुरात आले होते. मात्र कालांतराने या संशोधन केंद्राच्या माध्यमातून फार काही भरीव काम होऊ शकले नाही.
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख आणि विद्यापीठातील महर्षी शिंदे अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे आणि शहाजी महाविद्यालयातील प्रा. सुरेश शिखरे, प्रा. अवनीश पाटील हे इतिहास परिषदेसाठी पुसेगावला जात असताना प्रवासात विठ्ठल रामजी शिंदे यांचा विषय निघाला. तेव्हा प्रा. शिखरे यांनी शिंदे यांच्या नावे पहिले संशोधन केंद्र त्यांच्या महाविद्यालयात स्थापन झाले होते, अशी आठवण सांगितली.
मागील आठवड्यात डॉ. शिंदे हे शहाजी महाविद्यालयात गेले होते, तेव्हा त्यांनी प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण यांच्याकडे हा विषय काढला. तेव्हा शानेदिवाण यांनी असे केंद्र होते. मी सध्या महाविद्यालयाचा इतिहास लिहीत असून त्यामध्येही ही माहिती घेण्यात आल्याचे सांगितले. १९७३ साली हे संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २५ हजार रुपयांचा निधी दिला होता. या केंद्राच्या वतीने महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा व चळवळींचा अभ्यास केला जावा, अशी अपेक्षा होती. २००७ साली शिवाजी विद्यापीठामध्ये महर्षी शिंदे अध्यासनाची स्थापना करण्यात आली. त्याआधी या कामाला शहाजी महाविद्यालयातून सुरुवात झाली होती. परंतु काही काळानंतर केंद्राचे कामकाज बंद पडले. मात्र आता पुन्हा विद्यापीठाच्या अध्यासनाच्या सहकार्याने हे केंद्र पुनरुज्जीवित करणार असल्याचे प्राचार्य शानेदिवाण यांनी सांगितले.
चौकट
शंकरराव मोरे यांच्या कागदपत्रांचे हस्तांतरण
याच उद्घाटन समारंभामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक, दोन वेळा खासदार झालेले शंकरराव मोरे यांच्या कागदपत्रांचे हस्तांतरणही करण्यात आले. यामध्ये मोरे यांच्या वह्या, असंख्य पत्रे, अहवाल, लेख, कात्रणे, पुस्तके यांचा समावेश आहे. सत्यशोधक समाज, ब्राह्मणेतर चळवळ, कॉंग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाशी निगडित पत्रव्यवहार यांचा समावेश आहे.
१७०२२०२१ कोल महर्षी शिंदे ०१
महर्षी शिंदे
१७०२२०२१ कोल महर्षी शिंदे ०२
कोल्हापूर येथील शहाजी महाविद्यालयात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावे सुरू करण्यात आलेल्या संशोधन केंद्राचे उद्घाटन तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी डावीकडून उदयसिंगराव गायकवाड, वसंतराव नाईक, श्रीपतराव शिंदे, रत्नाप्पाणा कुंभार उपस्थित होते.