भोगावती : कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्त्यांनी करवीरपाठोपाठ राधानगरी तालुक्यावर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केलेले आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांच्या मॅरेथॉन बैठक सुरू असतानाच मात्र नेते, त्यांचे कार्यकर्ते मतदारांशी वैयक्तिक संपर्कावर भर देत आहेत व आपली भूमिका स्पष्ट करत आहेत.
राधानगरी तालुक्यात ४५८ मतदार आहेत. स्थानिक नेत्यांच्या नावावर काही ठराव असून, दूध संस्थेच्या संचालक मंडळ किंवा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या नावावर देखील ठराव नोंद करण्यात आलेले आहेत. गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याअगोदरच जिल्ह्यातील बहुतेक नेते आणि कार्यकर्त्यांनी राधानगरी तालुक्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे.
प्रमुख नेत्यांच्या पैकी दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ मार्गदर्शक अरुण नरके, माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण डोंगळे, रणजित पाटील-मुरगूड यांच्यासह विद्यमान संचालक बाळासाहेब खाडे, राजेंद्र भाटले, उदय पाटील-सडोलीकर, विश्वास जाधव, रमा बोंद्रे, शशिकांत पाटील- चुयेकर, कुंभी बँकचे अध्यक्ष अजित नरके, चेतन नरके, दीपक पाटील यांच्यासह अंबरिश घाडगे, कार्यकर्ते अशा विविध मान्यवर मंडळांनी या तालुक्यात आपली उमेदवारी निश्चित समजून प्रचाराला सुरुवात केली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या गटातील उमेदवारी नेमकी कोणाला देणार याबाबतचे पत्ते अद्याप खोललेले नसले तरी त्यांच्या गटातील असणाऱ्या राधानगरी तालुक्यातील भोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, विजयसिंह मोरे यांनी मंत्री पाटील यांची गोकुळसंबंधी भूमिका सांगण्यासाठी प्रचारात आघाडी घेतलेली आहे.
शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्याकडून मात्र अद्याप कोणीही प्रचारात उतरलेले दिसत नाहीत. मात्र, सध्या येणाऱ्या नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीने मतदारांना आपल्या उमेदवाराने उमेदवारीबाबत आणि दूध संघाच्या हितासाठी आपण किती प्रयत्नशील आहोत याबाबत मतदारांना माहिती देण्याचे काम केले जात आहे.