संपूर्ण आयुष्यात क्वचितच कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळते. ही संधी भारतीयाना रविवारी २१ जूनला उपलब्ध होईल, पण मोसमी पाऊस आणि कोरोनामुळे निर्माण झालेली लॉकडाऊनमुळे खगोलप्रेमीचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता जास्त दिसते. भारतामध्ये काही भागांतून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे, तर काही भागांतून खंडग्रास दिसणार आहे.
पाच जून रोजी झालेल्या चंद्रग्रहणानंतर याच महिन्यात रविवारी हे सूर्यग्रहण होणार आहे. मृग नक्षत्रावर हे कंकणाकृती सूर्यग्रहण होत आहे. १० जानेवारी आणि पाच जून रोजी दोन चंद्रग्रहण झाली आहेत. आता रविवारी पहिलं सूर्यग्रहण आणि वर्षातील तिसरे ग्रहण होणार आहे.
५ जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी होणारे चंद्रग्रहणही खंडग्रास असणार आहे. या वर्षातील हे तिसरे चंद्रग्रहण असेल. जुलै महिन्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या ३० तारखेला पुन्हा चंद्रग्रहण असणार आहे. १४ डिसेंबर रोजी असणारे सूर्यग्रहण या वर्षातील अखेरचे ग्रहण असणार आहे. ते भारतातून दिसणार नाही. सूर्यग्रहणाचे वेध लागेपर्यंत भारतात सूर्यास्त झाला असेल.
रविवारी होणारे सूर्यग्रहण सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी ३ वाजून ३ मिनिटांपर्यंत राहील. भारतासह हे सूर्यग्रहण अमेरिका, दक्षिणपूर्व युरोप आणि आफ्रिकेतही दिसून येईल. यावेळी उत्तर भारतातील कुरुक्षेत्र ते जोशीमठ व लेह पट्ट्यात कंकणाकृती सूर्य ग्रहण दिसणार आहे. देशाच्या इतर भागांतून खंडग्रास स्थिती दिसणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून हे ग्रहण खंडग्रास दिसेल. महाराष्ट्रात सकाळी १० ते १.२८ या काळात हे ग्रहण दिसणार आहे. मुंबईत सूर्य 70℅ तर कोल्हापूरच्या परीसरात 60% सूर्यासमोर चंद्र बिंब येणार आहे.
यावेळेस कंकण (बांगडी) फक्त 40 सेंकद दिसणार आहे. ही बांगडी इतकी लहान असेल की ती सूर्याचा एक टक्काच असेल, तर सूर्याच्या ९९% भाग चंद्र समोर येऊन व्यापणार आहे. सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी ग्रहणाला सुरूवात होणार आहे. दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी सर्वोच्च स्थितीमध्ये असेल तर दुपारी तीन वाजता हे संपणार आहे. म्हणजेच हे सूर्यग्रहण जवळपास सहा तास चालणार आहे.
सूर्यग्रहण म्हणजे काय?सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जेव्हा चंद्र येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण असे म्हणतात.
खग्रास सूर्यग्रहण –जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात.
खंडग्रास सूर्यग्रहण –जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात.
कंकणाकृती सूर्यग्रहण –कंकणाकृती सूर्यग्रहणामध्ये चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो . या सूर्यग्रहणात चंद्र जास्त अंतरावर असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडा चंद्राच्या मागे निर्माण होते.त्या ला कंकण म्हणतात यावेळी हे कंकण. सर्व ाात लहान असे ल.
तुमच्या डोळ्यांची काळजी घ्या
सूर्यग्रहण असो वा नसो, सूर्याकडे थेट उघडय़ा डोळ्यांनी पाहणे हानिकारक आहे. सूर्यग्रहण पाहू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षित सोलर फिल्टर्स असलेले चष्मे घालण्याचा किंवा प्रोजेक्शन पद्धत वापरून सूर्यग्रहण पाहण्याचा आग्रह धरा. सुरक्षित सौर चष्मे किंवा तज्ज्ञांनी सुचवलेल्या सुरक्षित पद्धतीनेच कुणीही, कोणत्याही ठिकाणावरून सूर्यग्रहणाचा आनंद लुटू शकतो, यात शंका नाही.
-डॉ राजेंद्र भस्मे, कोल्हापूर