लॉकडाऊन हा काही पर्याय नाही. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार लॉकडाऊन करणार असल्यास त्यापूर्वी सर्व घटकांचा विचार होणे अपेक्षित आहे. कोणत्याही घटकांची कुचंबणा होऊ नये, कोणावर उपासमारीची वेळ येऊ नये, यादृष्टीने प्रथम उपाययोजनांची आखणी करावी. या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी सक्षम यंत्रणा उभी करावी. लॉकडाऊनमधील वीजबिल, कर आकारणी, कर्जाचे हप्ते याचा भार शेतकरी, कामगार, व्यापारी व उद्योजक यांना सोसावा लागू नये, असेही खासदार संभाजीराजे यांनी पत्रात म्हटले आहे.
कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवावा. तूर्तास लसीचा राखीव साठा न करता सर्वांपर्यंत लस पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. लस वाया जाण्याचे प्रकार थांबवावेत, असे नमूद करून पत्रात पुढे म्हटले आहे की, बाधितांचा रिकव्हरी रेट वाढवून मृत्यू दर रोखणे हे देखील सरकारपुढील आव्हान आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा होत असलेला काळाबाजार व साठेबाजीस आळा घालण्यासाठी या इंजेक्शनचे वितरण संपूर्ण सरकारच्या नियंत्रणात घ्यावे. रुग्णालयांची कार्यक्षमता वाढवावी, बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलिंडर, अशा आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. लॉकडाऊन जनतेला कोरोनापेक्षा जास्त जाचक वाटणार नाही याची खबरदारी घ्या.