नृसिंहवाडी (जि. कोल्हापूर) : येथील श्री दत्तमंदिरात गुरुवारी दुपारी तीन वाजता या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा उत्साहात पार पडला. अधिक महिना, गुरुवार त्यामुळे रात्री उशिरापर्यंत हा सोहळा सुरु होता. हजारो भाविकांनी गुरुदेव दत्तच्या गजरात दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला.मृग नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे येथील कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासांत दहा फुटाने वाढ झाली. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास येथील दत्तमंदिरात कृष्णा नदीचे पाणी पोहोचले व दुपारी तीन वाजता मंदिरात वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा झाला. सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर, बेळगाव, आदी ठिकाणांहून भाविक दर्शन व स्नानासाठी दाखल झाले होते. नदीचे पाणी वाढल्यामुळे भाविकांना दर्शन व स्नान सुरक्षित व्हावे, यासाठी श्री दत्त देव संस्थानच्यावतीने दर्शन रांग व सुरक्षा रक्षकाची व्यवस्था केली होती. मंदिर व परिसरात पाणी आल्याने परिसरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविले आहे तर श्रींची उत्सवमूर्ती श्री नारायणस्वामी यांच्या मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली आहे.दक्षिणद्वार सोहळा प्रसिद्ध दत्तमंदिर पूर्वाभिमुख असून समोरून कृष्णा नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. पावसाळ्यात नदीचे पाणी वाढल्याने मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून कृष्णानदीचे पाणी मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून श्रींच्या पादुकांना स्पर्श करीत दक्षिणद्वारातून बाहेर पडते. यालाच दक्षिणद्वार सोहळा, असे म्हटले जाते.
नृसिंहवाडीत पहिला दक्षिणद्वार सोहळा
By admin | Published: June 26, 2015 12:36 AM