कोल्हापूर : महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समितीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या व प्रतिष्ठेच्या सभापतिपदी एखाद्या महिलेला संधी मिळणार आहे. गुरुवारी ‘स्थायी’च्या सभापतिपदासाठी सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून मेघा आशिष पाटील यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करून ही संधी मिळवून दिली. त्यांच्या या निवडीवर येत्या सोमवारी शिक्कामोर्तब होईल.स्थायी समिती सभापतिपदासाठी विरोधी भाजप-ताराराणी आघाडी यांच्याकडून आशिष मनोहर ढवळे यांचे नामनिर्देशन पत्र भरण्यात आले असले तरी सभागृहातील बहुमत लक्षात घेता त्यांची ही केवळ निवडणूक प्रक्रियेचा औपचारिकपणाच ठरणार आहे. निवडणूक बिनविरोध करून द्यायची नाही म्हणून ढवळे यांनी आपले नामनिर्देशन पत्र भरले आहे.
काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीत ठरलेल्या निकषांनुसार पुढील एक वर्षाकरीता स्थायी समितीचे सभापतिपद हे राष्ट्रवादीकडे राहणार आहे. त्यामुळे या पक्षाकडून मेघा पाटील, अजिंक्य चव्हाण व अफजल पिरजादे असे तिघेही इच्छुक होते. पिरजादे यांच्याकडे गेल्या दोन वर्षांपासून प्रभाग समिती सभापतिपद असल्याने त्यांचे नाव ‘स्थायी’च्या शर्यतीतून बाहेर पडले. तथापि अजिंक्य चव्हाण यांनी मात्र आपला आग्रह कायम ठेवला. त्यामुळे त्यांना ‘नंतर संधी देण्यात येईल,’ असा ‘शब्द’ देण्यात आल्याने मेघा पाटील यांचा मार्ग सुकर झाला.पाटील यांच्या पत्रावर पिरजादे व दीपा मगदूम यांच्या सूचक व अनुमोदन म्हणून सह्या आहेत. पाटील यांच्या विरोधात आशिष ढवळे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.परिवहन समिती सभापतिपद यावर्षी प्रत्यक्षात काँग्रेसकडे जाणार होते; पण गतवर्षापासून शिवनेना सत्ताधारी आघाडीसोबत असल्याने हे पद शिवसेनेला देण्याचे ठरले. त्यामुळे शिवसेनेकडून राहुल सुभाष चव्हाण यांनी नामनिर्देशनपत्र भरले तर विरोधी भाजप-ताराराणी आघाडीकडून शेखर श्रीकांत कुसाळे यांनी नामनिर्देशनपत्र भरले. त्यामुळे चव्हाण विरुद्ध कुसाळे अशी लढत होईल.महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी सुरेखा प्रेमचंद शहा यांची निवड होणार हे गुरुवारी स्पष्ट झाले. काँग्रेसकडून त्यांचे नामनिर्देशनपत्र भरण्यात आले तर त्यांच्या विरोधात ताराराणी आघाडीच्या अर्चना उमेश पागर यांनी नामनिर्देशन पत्र भरले. उपसभापतिपदासाठी छाया उमेश पोवार (काँग्रेस) तर ललिता अरुण बारामते (भाजप) यांनी नामनिर्देशनपत्रे भरली आहेत.नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याकरिता महापौर स्वाती यवलुजे, उपमहापौर सुनील पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर, काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांच्यासह आघाडीचे नेते उपस्थित होते तर विरोधी आघाडीकडून विरोधी पक्षनेते किरण शिराळे, भाजप गटनेते विजय सूर्यवंशी, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई उपस्थित होते.
सभापतींना सहा-सहा महिन्यांची संधीराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मेघा पाटील व अजिंक्य चव्हाण यांच्यात सभापतिपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. आमदार हसन मुश्रीफ यांनी त्यांच्याशी बोलून दोघांना संधी देण्यात येईल, असा ‘शब्द’ दिला होता.
एकाला संधी मिळाली तर दुसऱ्याला कधी संधी देणार हा कळीचा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे सहा-सहा महिने दोघांना संधी देण्यात येईल, असे सांगण्यात आले. मग पहिल्यांदा कोण, असा प्रश्नही चर्चेत आला. त्यावेळी पाटील यांना पहिले सहा महिने तर चव्हाण यांना त्यानंतरची सहा महिने संधी देण्याचे ठरले, तसे लेखी पत्र लिहून घेण्यात आले.
ललिता बारामतेंची संधी हुकलीमहिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतिपदासाठी सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादीकडून कोणीच इच्छुक नसल्याने नामनिर्देशनपत्र भरले नव्हते. त्याचवेळी भाजपकडून ललिता ऊर्फ अश्विनी बारामते यांनी नामनिर्देशनपत्र भरले होते.
जर आपण अर्ज भरला नाही तर बारामते यांनी बिनविरोध निवड होणार हे लक्षात येताच वेळ संपण्यास दहा मिनिटे कमी असताना घाईगडबडीने छाया पोवार यांचे नामनिर्देशनपत्र भरण्यात आले.