नांदणी/कोल्हापूर : लाखो भाविकांच्या उपस्थितीत न भूतो न भविष्यती असा नांदणी मठाच्या इतिहासातील पहिला पट्टाभिषेक सोहळा येथे पार पडला.
नांदणी मठाचा इतिहास नव्याने सुरू होत आहे. नव्या भट्टरकाना प्राकृत भाषेचे ज्ञान आहे, त्यानी या ज्ञानाचा वापर शिक्षण संस्था, रुग्णालय, वसतिगृह निर्माण करून त्याचा समाजासाठी वापर करावा, असे आशीर्वचन श्रवणबेळगोळचे चारुकिर्ती महास्वामी यांनी या सोहळ्यात दिले.
शिरोळ तालुक्यातील नांदणी येथे नूतन जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांचा मुख्य पट्टाभिषेक सोहळा येथील प्राचीन मठामध्ये भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी भट्टारक लक्ष्मीसेन, चारुकिर्ती महास्वामी, ललीत कीर्ती महास्वामी, भुवनकीर्ती महास्वामी, धवांकीर्ती महास्वामी, भणुकीर्ती, अकलंक यांच्यासह १४ भट्टारक मुनी, आर्यिका यांनी आशिर्वाद दिला.
या सोहळ्यास देशातील विविध ठिकाणाहून लाखो भाविकांनी उपस्थिती लावली होती. मठातील या मुख्य पट्टाभिषेक सोहळ्यानंतर हत्ती, घोडे, छत्र, चौघडा, राजदंड, तोरण यासह महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये फेटेधारक कुमारिका, शुभ्र वस्त्र परिधान करून फेटे घातलेले युवक अग्रभागी होते. या मिरवणुकीत महिलांचा सहभागही मोठा होता.