आॅनलाईन लोकमत/गणेश शिंदे
कोल्हापूर, दि. २२ : कोल्हापूरसह कोकण, सीमाभागाील गरिबांचे आधारवड व जिल्हयाची आरोग्य वाहिनी असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) इतिहासामध्ये कायमस्वरुपी व पूर्णवेळ प्रथमच मेंदूवरील शस्त्रक्रिया आणि मणक्यावरील विविध शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रथमच ‘न्युरोसर्जन’मिळाला आहे. त्यामुळे यापुढे आता सीपीआरमध्ये मेंदूवरील सर्व शस्त्रक्रिया ,मणक्याचे विकारावर निदान होणार आहे.
न्युरोसर्जनमुळे येथील रुग्णांना नवसंजीवनी मिळणार आहे.यासाठी राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयासह अभ्यागत समितीने प्रयत्न केले आहेत. राज्यात १६ शासकीय वैद्यकिय महाविद्यालये आहेत.त्यापैकी पुणे,मुंबई आणि नागपूर या तीन शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात पूर्णवेळ न्युरोसर्जन (मेंदू शस्त्रक्रिया तज्ज्ञ)आहे.सध्या अपघाताचे वाढते प्रमाण यामुळे सर्वसामान्य रुग्ण जर एखाद्या अपघातात गंभीररित्या जखमी झाला तर त्याला थेट खासगी रुग्णालयाकडे जावावे लागते.
खासगी रुग्णालयाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने ते परवडणार नाही आहे. सहा महिन्यापुर्वी सीपीआरमध्ये ट्रामा केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.त्याठिाकाणी अत्याधुनिक यंत्रसामुग्री व बेडची व्यवस्था आहे.सातत्याने अभ्यागत समितीच्या बैठकीत पालकमंत्री व अभ्यागत समितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर सदस्यांसह प्रशासनाने पूर्णवेळ व कायमस्वरुपी न्युरोसर्जन सीपीआरला द्यावा,अशी मागणी केली होती.
सातारा जिल्हयातील अनिल किसन जाधव (रा. भोसरी, ता. खटाव) हे न्युरोसर्जन दाखल झाले. त्यांनी मुंबईच्या केईएम मधून एमबीबीएस, जनरल सर्जरी (एम.एस.) नागपूरच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातून पूर्ण केले.त्यानंतर देशभरात सर्वोत्कृष्ठ मानल्या जाणाऱ्या बेंगलोर येथील ‘नॅशनल इन्स्टिटयुट आॅफ मेंटल हेल्थ न्युरोसायन्सेस’ (निमहान्स)मधून त्यांनी एमसीएच केले आहे. यापुर्वी सीपीआरमध्ये न्युरोसर्जन मानसेवी डॉक्टर होते.मात्र,ते फार कमी होते.
राजीव गांधी योजनेतील रुग्णांना मिळणार उपचार...
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत (पुर्वीची राजीव गांधी जीवनदायी योजना) सीपीआरचा समावेश आहे.साधारणत :११०० आजारांचा यामध्ये समावेश आहे. या योजनेमधून अशा रुग्णांना आता न्युरोसर्जन आल्यामुळे सीपीआरमध्ये उपचार घेता येणार आहे.
यावर होणार उपचार.
ब्रेन टयुमर
मेंदू मधील गाठी
मेंदूला मार लागल्याचे आजार
मणक्याचे आजार व इतर सर्व आदी.